एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन: देऊळगाव राजा बसस्थानकात उत्साहात वृक्षारोपण

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी; शंकर शिवरकर
देऊळगाव राजा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात एसटी प्रशासन आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश यावेळी देण्यात आला
महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या ‘हरित एसटी’ अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देऊळगाव राजा बसस्थानक परिसरामध्ये स्थानिक वातावरणाला साजेसे आणि सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी एसटी महामंडळ ही केवळ प्रवाशांची ने-आण करणारी सेवा नसून, ती सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे सांगितले. वृक्षारोपण करून केवळ औपचारिकता न पाळता, लावलेल्या झाडांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रवासी कल्याण संस्थेचे प्रा. विनायकराव कुलकर्णी यांनी एसटी महामंडळाच्या कार्याचा आढावा घेत, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक श्री. संजय गायकवाड, श्री. सानप, श्री. खारडे, श्री. खांडेभराड, श्री. अवचार तसेच सौ. खिल्लारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्वागत समारंभानंतर बसस्थानक परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिपने साहेब,माजी नगराध्यक्ष संतोषभाऊ खांडेभराड, दादाराव खारडे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मसुदवाले, रामदास डोईफोडे, संतोष पुजारी, रंजीत काकड, नगरसेवक नासिरभाई, तेजराव मुंडे, पोलीस उपनिरीक्षक नारायणराव गीते, जायभाये साहेब, दामिनी पथक प्रमुख सौ. जयश्रीताई काकड,तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायकराव कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभारही त्यांनीच मानले.
या वृक्षारोपण मोहिमेत देऊळगाव राजा बसस्थानक परिसरातील एसटी महामंडळाचे अधिकारी, आगार व्यवस्थापक, चालक, वाहक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



