“तुला नेण्यासाठी आलोय!” घरात घुसून महिलेचा हात धरला; पती येताच आरोपीचा पलायन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : शहरातील तिरुपती नगर परिसरात एका महिलेचा सातत्याने पाठलाग करून, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी करणे, तसेच घरात घुसून महिलेला जबरदस्तीने बाहेर ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी रवि रामदास पिंपळे (रा. समता कॉलनी, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून १८ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सातत्याने पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी रवि पिंपळे हा तिचा दररोज पाठलाग करत होता. तसेच वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून, “तू मला आवडतेस, मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे,” असे सांगून तिला त्रास देत असल्याचा आरोप आहे.
आरोपीने महिलेचे फोटो मोबाइलमध्ये काढून ठेवले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, फोटो व्हायरल होऊ नयेत असे वाटत असल्यास पाच लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पती व मुलांचे अपहरण करण्याची धमकी
महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यास तिच्या पती व मुलांचे अपहरण करण्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. तसेच आपण आत्महत्या करून संबंधित महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
या प्रकारामुळे महिला त्रस्त झाली असून, आरोपीच्या वर्तनामुळे आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.
घरात घुसून महिलेला बाहेर ओढण्याचा प्रयत्न
दरम्यान, १८ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीने तिरुपती नगर येथील फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप आहे. घरात आल्याबाबत महिलेने विचारणा केली असता, “मी तुला नेण्यासाठी आलो आहे,” असे आरोपीने म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपीने वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून तिला घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महिलेचे पती घरी आल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
महिलेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत



