तहसील कार्यालयातील कामांसाठी नागरिकांची हेलपाटे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : येथील तहसील कार्यालयात ७/१२ उतारा, फेरफार, कोटवार बुक नक्कल यासह विविध महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. सुदाम विश्वनाथ डोईफोडे (नारायणखेड), विश्वास उत्तम गिरोली व अशोक जाधव यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रे व नोंदी मिळविण्यासाठी नागरिकांना कार्यालयात वारंवार ये-जा करावी लागत असल्याचे संबंधितांनी सांगितले. काही कामांसाठी गेल्या १५ दिवसांपासून कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून, वारंवार ये-जा केल्यामुळे प्रवासासह इतर खर्च वाढत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
दरम्यान, कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अरेरावीच्या भाषेत बोलले जात असल्याचा आरोपही संबंधित नागरिकांनी केला आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांशी सौजन्याने वागणे अपेक्षित असताना अशा वर्तनामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूलविषयक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या तक्रारींकडे तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची नाराजीही संबंधित नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या तक्रारींची संबंधित विभागाकडून दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक कार्यवाही केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



