जिल्ह्यात गॅस टंचाई तीव्र; सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, प्रशासनावर ताण….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा: २२ मार्च २०२६
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः खामगाव व परिसरात ही समस्या गंभीर बनली असून, गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळपासूनच गॅस एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची माहिती समोर येत आहे.
या टंचाईचा थेट परिणाम घरगुती स्वयंपाकावर होत असून, अनेक कुटुंबांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, हॉटेल, ढाबे व इतर लहान व्यावसायिकांवरही याचा परिणाम झाला आहे. गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे व्यवसायात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार व्यावसायिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, काही ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून गॅस वितरण सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून, “वेळेवर गॅस उपलब्ध करून द्यावा” अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे…..✍️



