शहीदांच्या बलिदानाला पत्रकार संघाचा मानाचा मुजरा!

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
स्वातंत्र्यदिनी चिखली तालुका पत्रकार संघाने शहिदांच्या स्मृतींना केले अभिवादन
चिखली भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. देशाच्या अखंडता व सार्वभौमत्वासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या वीर जवानांच्या त्यागाला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.
शहीदो की चिताओ पर हर बरस लगेंगे मेले ।
कुर्बानी करने वालो की यही आखरी निशानी होगी ॥
देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या वीरांचे पुण्यस्मरण करून देणार्या ह्या ओळींची प्रचिती चिखली तालुका पत्रकार संघ एका अनोख्या उपक्रमाने करुन देत आहेत.
नेहमीप्रमाणे चिखली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रजासत्ताकदिनी व स्वातंत्र्यदिनी शहीदांच्या बलीदानाची आठवण म्हणून त्यांच्या स्मारकस्थळी जावून अभिवादन करण्यात येत असते. त्यानुसार 15 ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिनी चिखली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहरातील शहीद स्मारकांना भेट देऊन वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले.
स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी 10 चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात तब्बल 75 फूट उंच ध्वजस्तंभावर झालेल्या तिरंगा ध्वजारोहण कार्यक्रमास चिखली तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर करत देशासाठी बलिदान देणार्या वीर जवानांचे स्मरण करण्यात आले.
यानंतर पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहासमोरील वीर शहीद जवान स्व. कैलास पवार, सिद्धार्थनगर येथील स्व. विजय भिसे तसेच शेलूद येथील वीर शहीद जवान स्व. दिलीप जाधव यांच्या पावन स्मृती स्मारकास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
देशाच्या सीमेवर खडा पहारा देताना आपल्या कुटुंबाचा, सुखाचा आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्या जवानांमुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत.
त्यांच्या त्यागाची जाणीव समाजाने सदैव ठेवावी आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वात राबवल्या गेलेल्या या उपक्रमात पत्रकार संघाचे सचिव महेश गोंधणे, उपाध्यक्ष भिकू लोळगे, कोषाध्यक्ष छोटू कांबळे,सहसचिव रमीज राजा, संघटक भारत जोगदंडे, जेष्ठ सदस्य रवींद्र फोलाने, कैलास गाडेकर, संतोष लोखंडे, रमाकांत कपूर, इफ्तेखार खान, सत्य कुटे, योगेश शर्मा, राजेंद्र बिडवे, शेख साबीर,राजेंद्र घोराडे, असलम हिरीवाले, विशाल गवई यांच्यासह शेलुद गावचे सरपंच मंगेश इंगळे, अक्षय पवार, सौरव गवई, संजु भिसे, पो.काँ. उमेश राजपूत, व पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला होता.













