राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी ; शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संस्थेचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन (मार्चपास्ट) सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
या प्रसंगी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सभ्य दीक्षित व ओम चित्ते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याच दिवशी शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही हा आनंदाचा क्षण उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमात विविध विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि राष्ट्रप्रेमाविषयी आपले विचार प्रभावीपणे मांडले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी खुशी नागरे हिने देशभक्तीपर विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता आठवीतील लायबा हुसेन हिने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वीर जवानांनी केलेल्या त्याग व बलिदानाची माहिती दिली. तर इयत्ता चौथीतील श्रेयांश पालोडकर याने आत्मविश्वासपूर्ण शैलीत आपले मनोगत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर लहान विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर आकर्षक कवायत सादर केली. त्यांच्या शिस्तबद्ध आणि देखण्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि प्रबोधनात्मक नाटिका सादर केली. या नाटिकेत विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, संस्कार आणि योग्य ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.
संस्थेचे संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजली पाहिजे आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे.” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना मॅडम यांनी प्रभावीपणे केले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी शेळके व उपाध्यक्षा डॉ. मीनल शेळके, मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख तसेच इतर मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













