कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनासाठी खडसे आग्रही; ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची मागणी

कुऱ्हा आरोग्य केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे; आमदार एकनाथ खडसे यांचा पाठपुरावा कायम
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर | प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत अतारांकित प्रश्नाद्वारे प्रभावीपणे मांडली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनाचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्या माध्यमातून ७ मे २०२५ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित प्रस्तावाची आयुक्त स्तरावर छाननी पूर्ण होऊन तो शासनाकडे प्राप्त झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी विधान परिषदेत दिलेल्या उत्तरात नमूद केली.
मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधांबाबत २९ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार, सध्या सुरू असलेली आरोग्यविषयक बांधकामे पूर्ण करून तेथे सेवा तातडीने सुरू करण्यावर शासनाचा भर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या टप्प्यावर नवीन संस्था मंजूर करणे किंवा नवीन बांधकामांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचेही शासनाने सांगितले.
असे असले तरी, कुऱ्हा परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू असून, भविष्यात या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



