जळगाव जिल्ह्यात ३५ वीज उपकेंद्रांच्या उभारणीला गती; खडसे यांच्या पाठपुराव्याने प्रश्न ऐरणीवर

जळगाव जिल्ह्यात ३५ वीज उपकेंद्रांच्या उभारणीला गती; खडसे यांच्या पाठपुराव्याने प्रश्न ऐरणीवर
वीज उपकेंद्रांच्या कामातील विलंबावर विधान परिषदेत खडसेंचा सवाल; शासनाकडून प्रगतीचा आढावा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्यासाठी प्रस्तावित वीज उपकेंद्रांच्या उभारणीच्या कामांबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत अतारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले आहे. ५३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही ११ महिन्यांनंतरही अनेक कामे अपूर्ण असल्याने त्यांनी याबाबत शासनाकडे जाब विचारला.
यावर मुख्यमंत्री यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सौर ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तांत्रिक फेरपडताळणीनंतर जळगाव जिल्ह्यात आता ३५ वीज उपकेंद्रांची उभारणी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या माध्यमातून करण्यात येत आहे. यापैकी २२ उपकेंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली असून, एका उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २१ उपकेंद्रांची कामे विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर असल्याची माहिती शासनाने दिली.
कामांमध्ये झालेल्या विलंबाबाबत शासनाने स्पष्ट केले की, कंत्राटदारांना प्रत्यक्ष कामादरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच वीज वाहिन्यांच्या उभारणीला काही ठिकाणी होत असलेल्या स्थानिक विरोधामुळे प्रकल्पाच्या गतीवर परिणाम झाला आहे. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असल्याचेही शासनाने नमूद केले.
जळगाव जिल्ह्यातील वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कामांमधील अडथळे समोर आले आहेत. यामुळे प्रकल्पाला अधिक गती मिळून जिल्ह्यातील नागरिकांना भविष्यात अधिक दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



