मुक्ताईनगरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; तीन वर्षीय बालकावर हल्ला

मुक्ताईनगरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; तीन वर्षीय बालकावर हल्ला
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस; तीन वर्षीय बालकावर हल्लामुक्ताईनगर प्रतिनिधी :मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ८ ते १० परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेलर गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात अवघ्या तीन वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बालकावर कुत्र्यांचा हल्ला सुरू असताना परिसरातील इमरान मनियार यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेत बालकाची सुटका केली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, बालकाचा जीव वाचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना नगरपंचायतीकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीचा श्वान नियंत्रणासंदर्भातील ठेका संपुष्टात आल्याची चर्चा असून, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत प्रशासन लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करत, या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. लहान मुलांचे जीव धोक्यात येत असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



