अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक वपिस्तूल परवान्यांचीही झाडाझडती घ्या…. विजय वहाडणे

कोपरगाव किसन पवार :
बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. धर्म-जात यांचा विचार न करता संपूर्ण समाज याविरोधात एकवटलेला दिसतो आहे.या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील बंदूक व पिस्तूल परवान्यांचीही एकदा झाडाझडती घ्यावी अशी मागणी कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष विजय वहाड़णे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
वहाडणे म्हणाले की, भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे व राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर बंदूक परवाने दिलेले आहेत असे निदर्शनास येत आहेत.
आता अहिल्यानगर जिल्ह्यातील दिलेले बंदूक परवानेही स्थगित ठेवून सर्वच परवान्याची पुनःश्च पडताळणी करणे गरजेचे आहे. असे केल्याने चुकीच्या-अपात्र व्यक्तींना दिलेले बंदूक परवाने रद्द करता येथील.गुन्हे घडण्याची वाट न पाहता आधीच खबरदारी घेतली तर गुन्हेगारी -गुंडगिरीस नक्कीच पायबंद बसू शकतो.
आपल्या जिल्ह्यातही अधिकृत व अनधिकृत बंदूक-पिस्तुले-कट्टे असणारच यात शंकाच नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोपरगाव तालुक्यात व शहरातही अनेकदा गोळीबाराचे
प्रकार घडलेले आहेत. काहींनी तर प्रसिद्धी व राजकीय स्वार्थासाठी स्वतःच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचे बोगस प्रकार घडवून कोपरगाव शहराला वेठीस धरल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.
म्हणूनच सर्वांच्याच हितासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वच बंदूक परवान्यांची त्वरित पडताळणी व्हावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.



