अंदाजपत्रकानुसार काम न करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टक यांनी केली

मलकापूर प्रतिनिधी :- मलकापूर शहरातून जाणार्या नांदुरा रोडच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र काही महिन्यांपासून ह्या रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडले असून आश्चर्याची बाब म्हणजे सदरच्या रोडचे अंदाजपत्रक हे सिमेंट रोडचे असतांना व अर्धा रस्ता सिमेंटचा झाल्यानंतर ह्या अर्धवट रस्त्याला डांबरीकरणाच्या रस्त्याचे थिगळ लावून तो पुर्ण करण्याचा प्रताप संबंधित ठेकेदाराने केला आहे.
तहसील चौक ते नांदुरा नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्याचे काम अंदाजे ४ कोटी रूपयांचे सुरू करण्यात आले होते. सदर काम हे प्रारंभीपासूनच थंडबस्त्यात व वादाच्या भोवर्यात सापडले होते. तर काही महिन्यांपासून हे काम अर्धवट होऊन बंद पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणार्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच दोन दिवसांपुर्वी या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे अंदाजपत्रक असलेल्या अर्धवट रस्त्याला डांबरीकरणाचे थिगळ लावून हा रस्ता पुर्ण करण्यात आला. एकीकडे अंदाजपत्रक हे सिमेंट काँक्रीटचे तर अर्धवट रस्ता सिमेंट काँक्रीटचा व अर्धा रस्ता हा डांबरीकरणाचा हे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर रस्त्याचे बिल काढण्यासाठीच संबंधित ठेकेदाराने हा खटाटोप केला असल्याची चर्चा असून अशाप्रकारे शासनाच्या पैशाची उधळपट्टी करणार्या व अंदाजपत्रकाला सोडून काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.



