*शेतकरी नेते गजानन पाटील बंगाळे जिल्हा जालना, यांनी सत्य घटनेवर *आधारित, फेसबुक अकाऊंटला*भावनिक पोस्ट केली आहे.शब्द’ पूर्ण झाला… पण ती ‘सोबत’ नाही!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव दि.१२ मार्च २०२६
४ एप्रिल १९९४ ची ती सकाळ… लग्नाची अक्षता पडली आणि श्रीमंत मामांची मुलगी माझ्या गरिबीच्या झोपडीत आली. घरात अठराविश्व दारिद्र्य होतं. ज्या हातांनी सोन्याचे पाळणे हलवले होते, त्या हातांना माती आणि घामाची सवय नव्हती. माझी पत्नी, माझ्या घराची लक्ष्मी, पण परिस्थितीमुळे ती कोमेजून गेली होती. एक दिवस तिने डोळ्यांत पाणी आणून मामांना सांगितलं, “बाबा, माझं घर खूप गरीब आहे…”
ते शब्द काळजाला आरपार चिरून गेले. गरिबीचा तो घाव अपमानापेक्षा जास्त वेदना देऊन गेला. त्या दिवशी मी मान खाली घातली, पण मनात एक जिद्द पेटली. मी मामांना आणि माझ्या पत्नीला एक शब्द दिला होता— “आज दिवस कठीण आहेत, पण माझ्या कष्टावर विश्वास ठेवा. एक दिवस असा येईल की, मी तुला आणि आपल्या मुलांना विमानात बसवून जग फिरवेन!”
त्या शब्दावर विसंबून आम्ही सुखाचा संसार सुरू केला. मी रात्रंदिवस एक केला, घाम गाळला, स्वतःला कष्टाच्या भट्टीत झोकून दिलं. वाटलं होतं, आता दिवस फिरतील… पण नियतीचा खेळ निराळाच होता. आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि अचानक तिने माझी साथ सोडली. अर्ध्या वाटेवर ती निघून गेली आणि पदरात दोन लहान मुलं सोडून गेली.
पत्नी गेल्यावर आभाळ कोसळलं होतं, पण तिच्या स्मृती आणि तो दिलेला ‘शब्द’ मला स्वस्थ बसू देत नव्हता. मुलांना आईचंही प्रेम दिलं आणि बापाचं कर्तव्यही निभावलं. देवाच्या कृपेने आणि मेहनतीने आज सर्व काही कमावलं. पैसा, मान-सन्मान आणि ऐश्वर्य पायाशी लोळण घेतंय.
आज मी चंदिगडच्या दौऱ्यावर आहे. सोबत आपला मुलगा ‘गणेश’ आहे. विमानात बसलो, खिडकीबाहेर ढगांकडे पाहताना उर भरून आला. आज माझ्याकडे विमानाचं तिकीट आहे, सोयीसुविधा आहेत… पण ज्या माऊलीला हा शब्द दिला होता, तीच ‘सीट’ आज रिकामी आहे.
”आज मी विमानात आहे ग, पण तू असतीस तर हा आनंद काही वेगळाच असता. गरिबी गेली, श्रीमंती आली, पण तुला दिलेला तो शब्द पूर्ण होताना पाहायला तूच नाहीस…”
विमानाच्या आवाजात माझे हुंदके कदाचित कोणाला ऐकू येणार नाहीत, पण मनाच्या कोपऱ्यात ती रुखरुख कायम राहील. शब्द पूर्ण झाला, पण स्वप्न अधुरं राहिलं….



