स्व. कमलिनीताई सहदेवराव भोपळे जयंतीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

हिवरखेड : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या मार्गदर्शिका तथा ज्येष्ठ समाजसेविका स्व. कमलिनीताई सहदेवराव भोपळे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा सहदेवराव भोपळे विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच स्व. कमलिनीताई सहदेवराव भोपळे व सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे होते.
या सोहळ्याला हिवरखेड नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष प्रतिभा येऊल, महिला व बालकल्याण सभापती प्रमिला मानकर, नगरसेवक किरण सेदानी, नगरसेवक आझमभाई, देविदास फोपसे, संस्थेच्या संचालिका अन्नपूर्णाताई बंड, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, चंद्रप्रकाश भोपळे, मुख्याध्यापक अरविंद गिऱ्हे, प्रा. विलास राऊत, योगशिक्षक नामदेव इंगळे, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, आजीवन सदस्य, गावातील प्रतिष्ठित व दानशूर व्यक्ती, पालक, पत्रकार बांधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या ठेवीतून शाळेतील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानूंगा वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘स्व. कमलिनीताई भोपळे सुकन्या योजना’ अंतर्गत गॅस शेगडी वितरण करण्यात आले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनिलकुमार भोपळे यांनी स्व. कमलिनीताई भोपळे यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम झाले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या मेहनतीला मिळालेली प्रेरणेची शाबासकी आहे, तर आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर भविष्यात उच्च ध्येय गाठावे आणि समाजाप्रती कृतज्ञतेची भावना जपत इतरांसाठी प्रेरणास्थान बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
या दिनाचे औचित्य साधून संस्थेचे कार्यवाह श्यामशील सहदेवराव भोपळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी अनेक दानशूर व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध देणग्या व पुरस्कार योजना जाहीर केल्या. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसही आधार मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. कौस्तुभ भोपळे यांनी स्व. कमलिनीताई भोपळे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला उजाळा देत गुणगौरव सोहळ्याची भूमिका स्पष्ट केली. स्व. कमलिनीताईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रतिभाताई येऊल व प्रमिलाताई मानकर यांनी मनोगत व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या परिश्रमाबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर दुनघव व डॉ. मयूर लहाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानूंगा वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्व. कमलिनीताई सहदेवराव भोपळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन, गरजू विद्यार्थ्यांना आधार आणि समाजातील दानशूर व्यक्तींना शैक्षणिक कार्याशी जोडणारा उपक्रम ठरला. ‘गुणवंतांचा गौरव आणि गरजूंचा आधार’ या भावनेतून साकारलेला हा उपक्रम स्व. कमलिनीताईंच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन करणारा ठरला.



