बेकायदेशीर सावकारी, फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी एकाविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता विकास आमोदकर
सहकारी संस्था, रावेरचे अधीन सहाय्यक निबंधक श्री. प्रदीप माधवराव महाजन यांनी दिलेल्या शासकीय फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की
तक्रारदार अर्जदार श्रीमती मंदाबाई मनोहर पाटील (वय ५४, रा. कुंभारखेडा, ता. रावेर) यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे बेकायदेशीर सावकारीबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, मंदाबाई पाटील यांचे पती कै. मनोहर प्रल्हाद पाटील यांनी गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील (वय ६० वर्ष, रा. सावदा, ता. रावेर) यांच्याकडून कर्जापोटी व्याजाने रक्कम घेतली होती. या रक्कमेच्या सुरक्षिततेसाठी आणि गहाण तारण म्हणून त्यांनी आपल्या शेतीचे खरेदीखत करून दिले होते.
कर्जाची परतफेड व्याजासह केल्यानंतरही गैरअर्जदाराने शेती परत करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर, व्याजापोटी आणखी एक शेत खरेदी करून घेतले. गैरअर्जदाराने बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून मंदाबाई पाटील व त्यांच्या कुटुंबाचा विश्वासघात करून त्यांची शेती हडप केली.
शासकीय कारवाई व गुन्हा दाखल:
या तक्रारीच्या चौकशीअंती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी ‘महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४’ च्या कलम १८ (१) व (२) नुसार आदेश पारित केले. गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील यांच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना नसताना त्यांनी बेकायदेशीर सावकारी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याच आदेशाच्या आणि कार्यालयीन पत्रांच्या अनुषंगाने, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सावदा पोलीस ठाण्यात गु. र. नं. 216/2026, ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ च्या कलम ३९ अन्वये गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील याच्याविरुद्ध रीतसर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक राहुल सानप करीत आहेत.



