बुलडाणा जिल्ह्यातील नऊ डाकघरांत २३ ऑगस्टला राखी बुकिंगची सुविधा; स्पीड पोस्टवर १० टक्के सवलत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावाला वेळेत राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बुलडाणा डाक विभागाने विशेष व्यवस्था केली असून, रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील प्रमुख पोस्ट ऑफिस राखी बुकिंगसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.
बुलडाणा प्रधान डाकघर, खामगाव प्रधान डाकघर, चिखली उप डाकघर, शेगाव उप डाकघर, मलकापूर उप डाकघर, नांदुरा उप डाकघर, देऊळगाव राजा उप डाकघर, मेहकर उप डाकघर आणि जळगाव उप डाकघर येथे रविवारी राखी बुकिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
स्पीड पोस्टवर १० टक्के सवलत : राखी जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी डाक विभागाने स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट दरावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
परदेशातही पाठविता येणार राखी : परदेशात राहणाऱ्या भावंडांनाही राखी पाठविण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे. भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवेद्वारे माफक दरात राखी परदेशात पाठविता येणार आहे. तसेच राखी पाठविण्यासाठी विशेष राखी लिफाफेही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी नागरिकांनी स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा आणि १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे.



