मुख्य रस्त्यावरील दुभाजकांच्या पोलवर बॅनर लावण्यास मनाई करा; यात्रेच्या पार्श्वभूमीवर बलवंतसिंग बावरे यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा ; शहरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांवरील (डिव्हायडर) नगर परिषदेच्या विद्युत व सौरऊर्जा खांबांवर बेकायदेशीरपणे बॅनर लावण्यास तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बलवंतसिंग दिलीपसिंग बावरे यांनी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक मा. श्री. नकवाल साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बावरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, देऊळगाव राजा शहरातील मुख्य रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून दुभाजक व त्यावर विद्युत पोल बसवले आहेत. मात्र, शहरातील काही नागरिकांकडून या शासकीय खांबांवर बेकायदेशीरपणे मोठे बॅनर लावले जात आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहनधारकांचे लक्ष विचलित होऊन अपघातांचा धोका वाढला आहे.
श्री बालाजी महाराज यात्रेसाठी पथदिवे उजळ असणे गरजेचे
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध श्री बालाजी महाराज यात्रेसाठी दरवर्षी देशभरातून हजारो भाविक शहरात येत असतात. या यात्रेदरम्यान रात्रीच्या वेळी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दुभाजकांवरील सर्व खांबांवरचे लाईट अतिशय उजळ आणि स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. जर या खांबांवर अनधिकृत बॅनर लावले गेले, तर प्रकाशाचा अडथळा निर्माण होऊन भाविकांना अंधाराचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत. दुभाजकांवरील पोलवर बॅनर लावण्यास कडक मनाई करून तेथील पथदिवे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी बलवंतसिंग बावरे यांनी केली आहे.


