बुलढाणामहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी दिलेले संदेश हे सुखी जीवनाचा ठेवा” : धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे

चिखली येथे अहिल्या संदेश यात्रेचा उत्साहात समारोप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

देऊळगावराजा: पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समाजाला दिलेले संदेश हे सुखी, समृद्ध आणि संस्कारित जीवनाचा ठेवा असून, त्यांच्या विचारांचा अंगीकार आजच्या समाजाने करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे यांनी केले.

चिखली येथे आयोजित अहिल्या संदेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय आणि राष्ट्रहिताच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

श्रीराम पुंडे म्हणाले की, अहिल्यादेवींनी समाजाला जीवन जगण्याची दिशा देणारे पाच महत्त्वपूर्ण संदेश दिले. देश आणि धर्माचे रक्षण करा, गंगाजलाप्रमाणे निर्मळ जीवन जगा, रंजल्या-गांजल्यांची सेवा करा, शिका-संघटित व्हा-स्वाभिमानी बना आणि प्रसंगी संघर्ष करा, तसेच समाधानी राहा, हे त्यांचे विचार आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहेत. “वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ” या विचारातून त्यांनी जीवनातील समाधान, सेवाभाव आणि सत्कर्माचे महत्त्व सांगितले.

अहिल्यादेवींचे कार्य केवळ एका राज्यापुरते मर्यादित नव्हते. धर्म आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केले. त्यांची प्रशासन व्यवस्था अत्यंत सक्षम आणि लोकाभिमुख होती. विशेषतः त्यांची जलनीती आणि जलव्यवस्थापनाची दृष्टी अत्यंत प्रभावी होती. भारताच्या ज्ञात इतिहासात पाणी व्यवस्थापनाचे तंत्र जाणणाऱ्या व्यक्तींमध्ये अहिल्यादेवींचे नाव महत्त्वाने घेतले जाते, असे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी म्हटल्याचा उल्लेख पुंडे यांनी केला.

महेश्वर येथे अहिल्यादेवींनी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. आजही महेश्वरी साडी जगभर प्रसिद्ध आहे. देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, रस्ते, घाट, धर्मशाळा तसेच विविध सार्वजनिक सुविधा उभारण्याचे कार्य त्यांनी केले. आपल्या राज्याचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करून त्यांनी लोककल्याणकारी कार्य केले.

“त्या काळात देशात अनेक संस्थाने होती. बहुतांश संस्थानिकांनी आपल्या राज्याच्या हिताचा विचार केला; मात्र अहिल्यादेवींनी संपूर्ण देशाचा विचार केला. राष्ट्राबद्दल त्यांना उदंड प्रेम होते. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना नमन करणे म्हणजे भारतीय संस्कृतीला नमन करणे होय,” असे श्रीराम पुंडे यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाची जगातील अन्य कर्तृत्ववान महिला राज्यकर्त्यांशी तुलना केली जाते. अमेरिकेतील लेखक जॉन की यांनी आपल्या पुस्तकात इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम, रशियाची राणी कॅथरीन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट द्वितीय यांच्या कार्याचा उल्लेख करताना अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचे मोठेपण अधोरेखित केल्याचे पुंडे यांनी नमूद केले. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला इतिहासात तोड नाही,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला धनगर आरक्षण योद्धे दीपक बोराडे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. अलका गोडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंकुश पडघान, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, नगरसेवक कुणाल गायकवाड, उपनगराध्यक्ष कपिल खेडेकर, शंतनु बोंद्रे, मनोहर पाचपोर, शत्रुघ्न पाचपोर, प्रदीप हाके, पंडितराव साठे, मोतीराम लवंगे, प्रवीण सरदड, अरुण मखमले, भगवान खरात, प्रशांत भटकर, दीपक हाके, संपतराव मिसाळ, विजय शेळके, माणिकराव खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष कडूबा गवारे, मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील मतकर, संजय काळे, विलास खरात, शिवानंद वीर, मार्तंड पंडित, सुभाष वीर आणि अभिषेक वीर यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम सोरमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मार्तंड पंडित यांनी केले. अहिल्या संदेश यात्रेच्या समारोपास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button