अंतुर्लीमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर चोरी : ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे सहाय्यक प्रबंधक विशाल रमेश तायडे यांच्या घरात ६ डिसेंबरच्या सायंकाळनंतर चोरीची घटना घडली. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे.
विशाल तायडे हे त्या दिवशी सायंकाळी वरणगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी घरमालक रवींद्र सोनवणे यांनी त्यांना फोन करून घराचे दरवाजाचे तुटलेले कुलूप दिसत असल्याची माहिती दिली. तायडे यांनी तत्काळ अंतुर्लीत परत येऊन पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तपासात कपाटातून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि तीन ग्रॅम वजनाचे धम्मचक्र असलेले सोन्याचे पेंडल असा मिळून ६५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
फक्त तायडे यांचे घरच नव्हे, तर गावातील आणखी चार ठिकाणीही घरफोडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी विशाल तायडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेढे पुढील तपास करीत आहेत.



