चितलवाडी फाट्यावर एस.टी. बस थांब्यासाठी रोहीत हिवराळे यांची मागणी ; हिवरखेड व अकोट येथे निवेदन सादर!

चितलवाडी फाट्यावर एस.टी. बस थांब्यासाठी रोहीत हिवराळे यांची मागणी ; हिवरखेड व अकोट येथे निवेदन सादर!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अकोला जिल्हा प्रतिनिधी
विजय घोडे
दि. १ ऑगस्ट चितलवाडी (ता. तेल्हारा) : स्थानिक चितलवाडी येथील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी चितलवाडी फाट्यावर एस.टी. बसचा अधिकृत थांबा सुरू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिवरखेड बस डेपो तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोट आगार व्यवस्थापक मिथून शर्मा यांना देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चितलवाडी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी हिवरखेड, तेल्हारा व अकोट येथे नियमित ये-जा करतात. मात्र, एस.टी. बसचा अधिकृत थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्यावरील फाट्यापर्यंत पायी जावे लागते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात रोहित हिवराळे (तालुका प्रसिद्धीप्रमुख, वंचित बहुजन युवा आघाडी, तेल्हारा) यांच्या पुढाकाराने संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात हिवरखेड–तेल्हारा–अकोट मार्गावरील एस.टी. बसना चितलवाडी फाट्यावर अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.हिवरखेड बस डेपो येथे निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाऊ इंगळे, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष बाबुजी खोब्रागडे, नरेश बांगर, वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका सदस्य दिनेश इंगळे, युवक शहराध्यक्ष पवन भूडके, महासचिव राजू जाहागीरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.तर अकोट आगार येथे निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव अमन गवई, अकोट नगर परिषदेचे नगरसेवक इमरानभाई, तसेच प्रतीक तेलगोटे व विलास हिवराळे उपस्थित होते.यावेळी प्रशासनाने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाचा विचार करून चितलवाडी फाट्यावर लवकरात लवकर एस.टी. बसचा अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.



