समाजसेवेचा आदर्श जपत लहुजी शक्ती सेना पाचव्या वर्षीही सेवाकार्यात अग्रस्थानी; अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

खामगाव, प्रतिनिधी :
साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत समाजबांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मिरवणुकीतील सहभागी नागरिकांसाठी चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष अनंताभाऊ सकळकळे यांनी १ ऑगस्ट २०२२ रोजी या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात केली होती. यंदा हा उपक्रम सलग पाचव्या वर्षीही उत्साहात राबविण्यात आला. जयंती उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत लहुजी शक्ती सेनेच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक केले.याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे संजय पाटोळे, फकीरा कांबळे, सूरज वानखडे, विनायक कांबळे, दादू वानखडे, प्रशांत वानखडे, सिताराम सोनवणे, रमेश सकळकळे, सोपान चांदणे, पुंजाजी चांदणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अण्णाभाऊ साठे यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. समाजसेवा आणि जनसहभाग यांचा संगम घडविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.



