भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी घेतला भरीत-भाकरीचा आस्वाद


जळगाव 10-11-2022
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी घेतला भरीत-भाकरीचा आस्वाद
जळगावहून ६ क्विंटल वांग्यांचे भरीत तयार करून नांदेडला रवाना
प्रतिनिधी | जळगाव
महाराष्ट्रातील नांदेडमध्ये दाखल झालेल्या भारत जोडो पदयात्रेतील यात्रेकरूंसाठी जळगावहून खास तयार केलेल्या खान्देशी भरीत पुरीचा पाहुणचार देण्यात आला. राहुल गांधी यांनीही या मेजवानीचा आस्वाद घेतला.
पदयात्रेतील यात्रेकरूंनीही खान्देशी पाहुणचारवर चांगलाच ताव मारला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भरीत भाकरीच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर हा खान्देशी पाहुणचार राज्यात प्रसिध्द आहे.
स्टॉलवर चर्चा करताना बाळासाहेब थोरात आणि डॉ. उल्हास पाटील.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात नांदेडमार्गे दाखल झाली आहे. पदयात्रेत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.
यात्रेकरूंसाठी काँग्रेसचे प्रदेश
उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी १० हजार जणांसाठी भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर असा बेत केला. यासाठी ६ क्विंटल वांगे घेतले. भरीत तयार करण्याची जबाबदारी डिगंबर कोल्हे या स्पेशल मेकरवर सोपवली आणि तयार केलेल्या भरीत-भाकरी नांदेडला यात्रेसाठी रवाना करण्यात आल्या.




