दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; तापीमाई संस्थेचा नफ्यातील प्रवास कायम

अंतुर्ली (प्रतिनिधी): अंतुर्ली येथील तापीमाई दूध उत्पादक शेतकरी सहकारी संस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच सभासदांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले.संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे ₹2 कोटी 87 लाख इतकी झाली असून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थेला ₹1,87,283 इतका निव्वळ नफा झाला आहे. या नफ्यातून नियमित दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना ₹35,705 बोनस तसेच ₹26,500 किमतीच्या भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी अध्यक्ष दिनेश पाटील यांनी संस्थेच्या सभासदांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. नियमित दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना दुग्ध व्यवसायाचा विस्तार करता यावा यासाठी म्हैस खरेदीसाठी तिच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम बिनव्याजी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेच्या ‘विकास’ या दुग्धजन्य उत्पादनांना तसेच घरगुती दूध खरेदीला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सभा संपल्यानंतर जिल्हा सहकारी बोर्ड, जळगाव यांच्या वतीने संस्थेच्या सभासदांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सहकार बोर्डाचे जगदीश पवार यांनी सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक एस. ए. भोईसर, संचालक व मार्गदर्शक शरद महाजन, भाऊराव महाजन, डिगंबर महाजन, गोविंद महाजन, विशाल पाटील, अरविंद पाटील, विलास पाटील, सचिव शिवाजी पाटील, विलास नाना पाटील, संदीप ठोंबरे, अनिल वाडीले, शांताराम महाजन, नरेश पाटील, धनराज चौधरी, गंगाराम शिरतुरे, बबन पाटील, रामभाऊ पाटील, व्ही. आर. महाजन, रमेश महाजन, भास्कर सोनवणे, अशोक पाटील, दिवाकर पाटील, शांताराम दुट्टे, राजेश सोनार, संस्थेचे व्यवस्थापक नथू तायडे, सेल्समन संजय बोरसे, नितीन शिरतुरे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक नथू तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक भाऊराव महाजन यांनी मानले.



