जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संत मुक्ताई पालखीसाठी भव्य रथ समर्पित; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

मुक्ताईनगर : श्रीक्षेत्र मुक्ताईनगरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी घटना घडली असून, संत मुक्ताई संस्थानच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासाठी भव्य आणि आकर्षक रथ समर्पित केला आहे. हा रथ मुक्ताईनगर येथील नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात दाखल झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील वर्षी संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगर येथे आले असता संत मुक्ताई संस्थानच्या वतीने विविध विकासकामांच्या मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. यामध्ये संत मुक्ताई पालखीसाठी स्वतंत्र व भव्य रथ उपलब्ध करून देण्याची मागणी विशेष महत्त्वाची होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यांच्या प्रयत्नांना आणि संस्थेच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी पूर्ण केली आहे.

संत मुक्ताई पालखी परंपरेचे वैभव अधिक वृद्धिंगत करणारा हा रथ पूर्णतः तयार होऊन मंदिर परिसरात दाखल झाला आहे. या रथाची पाहणी आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्यासह वारकरी, टाळकरी, कीर्तनकार आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी उपस्थितांनी रथाच्या भव्यतेचे कौतुक करत हा वारकरी परंपरेच्या गौरवाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याला या रथामुळे अधिक दिमाख आणि वैभव प्राप्त होणार आहे. पालखीला आकर्षक व सुशोभित स्वरूप लाभणार असून मुक्ताईनगरच्या धार्मिक पर्यटनालाही त्याचा सकारात्मक लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भव्य रथाचा अनावरण सोहळा बुधवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे पार पडणार आहे. अनावरणानंतर संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री शिंदे वारकरी वेशात या सोहळ्यात सहभागी होत असून संत मुक्ताईंचे दर्शन घेऊन पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे.

या सोहळ्यास राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याने मुक्ताईनगर पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. संत मुक्ताई संस्थानच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामांना गती मिळत असल्याची भावना वारकरी आणि नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, सम्राट पाटील, विनायक हरणे, ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, हितेश पाटील, पियुष मोरे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर हरणे, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यभरातील वारकरी, भाविक आणि संतप्रेमींनी मोठ्या संख्येने मुक्ताईनगर येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील आणि संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button