शेगाव : खामगांव उपविभागीय पोलिस अधीकारी प्रदीप पाटील सह पथकाची धडाकेबाज कारवाई; 70 लाखांचा अवैध गुटखा जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
June 14, 2026
प्रतिनिधी:-सागर रावणचोरे
शेगाव : खामगांव उपविभागीय पोलिस अधीकारी प्रदीप पाटील सह पथकाची धडाकेबाज कारवाई; 70 लाखांचा अवैध गुटखा जप्त
-वरवट बकाल शेगांव मार्गावर नाकाबंदीतून मालवाहू वाहन पकडले; चालक अटकेत
शेगाव: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असतानाच, आता बुलढाणा पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वरवट बकाल शेगांव मार्गावर 70 लाखांचा अवैध गुटखा वाहून नेणारे मालवाहू वाहन जप्त करून पोलिसांनी गुटखा तस्करांना दणका दिला आहे.
कशी झाली कारवाई?
पोलीस सूत्रानुसार, 13 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी -वरवट बकाल शेगांव मार्गावरून अकोला-यवतमाळकडे पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड मालवाहू वाहनातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त खबर मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ वरवट बकाल-शेगाव रोडवरील यादव बेकरीसमोर नाकाबंदी केली. रात्री 10 वाजता संशयित वाहन क्र. MH-40-GT-2965 येताच झडती घेतली असता, वाहनात विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला.
काय जप्त केले?
जप्त मुद्देमालात ‘बाजीराव गोल्ड’, ‘मस्तानी टोबॅको’, ‘नजर 1000’, ‘N-05 प्रीमियम च्युइंग टोबॅको’ व ‘प्रीमियम नजर 9000’ या ब्रँडचा माल होता.
- गुटख्याची किंमत: 50,13,920 रुपये
- मालवाहू वाहनाची किंमत: सुमारे 20,00,000 रुपये
- एकूण मुद्देमाल: 70,13,920 रुपये
चालकाला अटक
वाहनचालक सुरुर अहमद नूर अहमद (वय 37, रा. फिरदोस कॉलनी, अकोला) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणी केली कारवाई?
पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या आदेशाने PSI सुनील राऊत, पोहेकॉ सुधाकर थोरात, योगेश कुंवारे व पो. शि. मंगेश सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.



