अजंदे-विवरे रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

ठेकेदारावर कारवाईची मागणी, अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
स्टार भारत लाइव्ह एक्सप्रेस
रावेर ता . प्रतिनिधि
विनोद तायडे
रावेर तालुक्यातील अजंदे ते विवरे या मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारामार्फत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून मुख्यमंत्री सड़क योजना बांधकाम विभाग जळगांव यांच्याकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
सध्या या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात कमी दर्जाचे साहित्य वापरणे, रस्त्याची आवश्यक जाडी न ठेवणे, तांत्रिक निकषांचे पालन न करणे तसेच कामामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला दिसत असून कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याने हा रस्ता काही दिवसांतच पुन्हा खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात दर्जाहीन कामामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याच रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमी व्यक्ती सध्या दवाखान्यात उपचार घेत असून रस्त्याची खराब अवस्था आणि निष्काळजी काम हे अपघातास कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांनी संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
“जनतेच्या जीवाशी खेळ करणारे निकृष्ट काम सहन केले जाणार नाही. प्रशासनाने त्वरित पाहणी करून नागरिकांना न्याय द्यावा,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



