संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींचा सत्कार; शेतकरी हिताच्या निर्णयांची अपेक्षा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर दि. १० मार्च २०२६
संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती व उपसभापतींचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या सभापतीपदी सोनाळा येथील प्रा. प्रदीपजी वडोदे तर उपसभापतीपदी उमेशजी तावरी यांची निवड झाल्यानंतर परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन करत पुष्पहार घालून व शाल देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमावेळी उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत संग्रामपूर बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी महत्त्वाची संस्था असून शेतमालाला योग्य भाव मिळावा, बाजारातील व्यवहार पारदर्शक व्हावेत तसेच शेतकऱ्यांना विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बाजार समितीवर असते. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांकडून शेतकरी हिताचे निर्णय घेत बाजार समितीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना सभापती प्रा. प्रदीपजी वडोदे यांनी सांगितले की, संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी हा बाजार समितीचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि बाजार समितीचे कामकाज पारदर्शक व प्रभावी पद्धतीने चालावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उपसभापती उमेशजी तावरी यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमावेळी परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नूतन सभापती व उपसभापतींना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले…..



