धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार; दोषींवर कारवाई करण्याची आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी

मुंबई: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधानपरिषदेत चांगलाच गाजला. आमदार एकनाथराव खडसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात माहिती दिली की, धामणदे ग्रुप ग्रामपंचायतीला सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत १५ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. मात्र, या निधीच्या विनियोगात प्रचंड अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी ६ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार करून पुराव्यासह तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन शासनाने काय कारवाई केली आणि दोषींवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा रोखठोक सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
आमदार खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तक्रारीतील सत्यता मान्य केली. त्यांनी सांगितले की मुक्ताईनगरच्या गट विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आहे.प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत अनियमितता झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकशीअंती जे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले.



