
अखिल विश्वधारार्थ जेव्हा ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे त्रिदेव या अवनितलावर अवतरीत होण्याच्या पूर्वतयारीत असतांना जेव्हा योग माया आदिशक्तीच्या निदर्शनास आले. तेव्हा तिनेही त्यांच्यासोबत अवतरीत होण्याचा आग्रह धारण केला असता भगवान विष्णू म्हणाले की, आम्ही भगवंत म्हणून नाहीतर संत रूपाने अवतरीत होणार असून तू जर आमच्या सोबत आली तर हे योगमाये ! तू तुझ्या स्वभावाप्रमाणे आहे ते झाकून नाही ते दाखवीत आमच्या जगदोद्धाराच्या कार्याला आच्छादित करून टाकशील. तेव्हा ती म्हणाली तुम्ही तिघे मिळून तीन कार्य करणार परंतु मी मात्र एकटीच तुमच्या पाठची बहीण बनवून तुमची पाठ राखण करेल , मानसकन्याहून तुमच्या ठिकाणी जगदोद्धाराचे वात्सल्य निर्माण करेल व प्रसंगी तुम्हा तीन मुक्तांची आई बनून तुम्हाला प्रेरणा देईल. दिलेल्या अभिवचनाप्रमाणे हे तिन्ही कार्य मुक्ताई रूपाने अवतरीत झालेल्या योगमायेने केल्याचे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले. ते आज श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्रीसंत वासुदेवजी महाराजांच्या अवतिर्णोत्सवानिमित्य आयोजित ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रवचन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की , ताटीच्या अकराही अभंगातून आईसाहेबांच्या शब्दांचे स्वर जरी विनंतीचे असले तरी , त्यात आद्यत्रय जननी म्हणून अधिकार , लडिवाळ बहीण म्हणून आग्रह व मानसकन्या या नात्याने बाप आपली इच्छा पूर्ण करेलच अशा आत्मविश्वासाचे आहेत. असे त्रिविध भाव महाराजांनी त्यांच्याच चरित्रांतील बारकाव्यांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या लक्षात आणून दिल्याचे भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.



