अन्यायग्रस्त टोकरे कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी संजय कांडेलकर यांचे आमरण उपोषण सुरूआज उपोषणाचा पाचवा दिवस; तहसीलदार, मनसे पदाधिकाऱ्यांची भेट

मुक्ताईनगर (प्रतिनिधी – )
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरपासून मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात संजय कांडेलकर यांनी टोकरे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळावे या न्याय्य मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून, समाज बांधवांसह प्रशासनाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले आहे.
संजय कांडेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून कोळी समाजातील टोकरे कोळी, आदिवासी कोळी इत्यादी उपजमातींना अनुसूचित जमातीचा दाखला देताना प्रशासनाने १९५० चा पुरावा मागितल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित किंवा रद्द होत आहेत. दहा प्रकरणांपैकी तीन प्रकरणांना दाखले मिळाले असले तरी सात प्रकरणांमध्ये दाखले रद्द करण्यात आले आहेत.
शासनाच्या परिपत्रकानुसार नातेवाईकांचे शाळा सोडल्याचे दाखले, रहिवासी किंवा महसूल पुरावे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चौकशी अहवाल, जन्मनोंद अशी कागदपत्रे दाखल करून अर्जदारांच्या दाव्यांची पडताळणी करण्याची तरतूद आहे. मात्र, या प्रक्रिया पूर्ण न करताच अर्ज रद्द करणे अन्यायकारक आहे, असा कांडेलकर यांचा आरोप आहे.
कांडेलकर यांनी पुढे सांगितले की, “ज्यांच्याकडे जुने शाळा सोडल्याचे दाखले किंवा जन्मनोंदी उपलब्ध नाहीत, त्यांनी शपथपत्राद्वारे आपली नोंद खरी असल्याचे नमूद करावे आणि त्यानुसार सक्षम अधिकाऱ्यांनी चौकशी करून निर्णय घ्यावा. हा अधिकार शासनाने दिला असून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी आम्ही लढा देत आहोत.”
आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी तहसीलदार गिरीश वखारे यांनी भेट देऊन चर्चा केली. तसेच मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, उपाध्यक्ष श्रीराम भोई, जयेश तायडे, पंकज कोळी, एच. जी. सपकाळे, सुनील कोळी, विलास कोळी आणि तुकाराम कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.
या आंदोलनामुळे कोळी समाजाच्या हक्कांसाठी नवा जनआंदोलक सूर उमटत असून, प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी समाजातून होत आहे.



