मुक्ताईनगरमध्ये मटन व्यवसायातून गटांमध्ये हाणामारी; पर्यावरण, जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम – प्रशासनाचे काय धोरण?

मुक्ताईनगर, ता. ५ ऑगस्ट – संत मुक्ताईंच्या पुण्यभूमीत, मुक्ताईनगर शहरात सध्या मटन व्यवसायातून गंभीर अनागोंदी निर्माण झाली असून, ग्राहकावरून दोन मटन व्यावसायिक गटांमध्ये थेट हाणामारी झाली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, वारकरी संप्रदायासह जागरूक नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडत आहे की, नगरपंचायतीने या मटन व्यवसायांना कोणत्या कायदेशीर आधारावर परवानग्या दिल्या आहेत? तसेच, जे जनावरे कापली जात आहेत, त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरांची तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाले आहे का?
निसर्गाचे होत आहे मोठे नुकसान
या मटन विक्रेत्यांकडून जनावरांच्या कापल्यानंतर उरलेला अवशेष, मलिदा व इतर जैविक कचरा थेट गावातील नालीत केली जाते तसेच, नदीच्या पात्रामध्ये फेकण्यात येतो. परिणामी, पाण्याचे व वायूचे प्रदूषण वाढून निसर्गाचाही अपार नुकसान होत आहे. विशेषतः, हेच प्रदूषित पाणी नगरपंचायतीमार्फत नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मुक्ताईनगरसारख्या संतांच्या भूमीत मासाचे अवशेष मिसळलेले पाणी नागरिकांच्या घरात पोहोचत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक असून भाविक आणि वारकरी संप्रदाय यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
प्रशासनाची भूमिका काय?
या प्रकरणी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली आहे, की अजून कुठलीही दखल घेतलेली नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. संतभूमीत असा व्यवसाय चालवून पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो आहे, तर प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
वारकरी संप्रदाय व सुज्ञ नागरिकांची मागणी
स्थानिक वारकरी संप्रदाय व सुज्ञ नागरिकांनी मटन व्यवसायावर तातडीने नियमबद्ध नियंत्रण आणावे, पशुवैद्यकीय तपासणी व कत्तल परवानग्या नियमित कराव्यात, मलिद्याची विल्हेवाट वैज्ञानिक पद्धतीने लावावी, आणि नदीप्रदूषण थांबवावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना सर्वसामान्य जनतेत व्यक्त होत आहे.



