कै.लालाशेठ बिहाणी विद्या मंदिर येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दत्ता जोगदंड
… जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येत असताना विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा बारावीचा निरोप समारंभ राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य कैलास अनाप होते. अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम साजरा केला. त्यांनी शिक्षक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचा पेन आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, फ्रीडम पाॅवर पत्रकार संघटना राहूरी तालुका अध्यक्ष दत्ताजी जोगदंड, अँक्टीव्ह मराठी न्युज उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन करताना सांगितले, “स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी ठाम ध्येय, जिद्द आणि कठोर मेहनत या तीन गोष्टींचा स्वीकार करावा. शिक्षण ही केवळ परीक्षा पास होण्याची प्रक्रिया नाही, तर जीवनभर ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती असावी. आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे ऋण कायम स्मरणात ठेवा आणि जीवनात चांगले संस्कार रुजवा.”
प्राचार्य कैलास अनाप यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी यंदा एचएससी आणि एसएससी बोर्डाने राबवलेल्या कॉपीमुक्त अभियाना विषयी माहिती दिली आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “शालेय जीवनात शिक्षक जसे तुमच्या मागे लागतात. तसे कॉलेज जीवनात कोणीही लक्ष देणार नाही. त्यामुळे इथे घेतलेले धडे पुढील वाटचालीत महत्त्वाचे ठरतील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी शास्त्र शाखेची कु. रुद्रा धेंडे या विद्यार्थीनीने केले. प्राध्यापक रवींद्र घनवट आणि संजय भडके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिले. तसेच सुलेम शेख, समृद्धी साठे, ऐश्वर्या फलके, तन्वी चोरडिया, भक्ती कासार, प्राजक्ता शिंदे, आस्मा शेख, आशुतोष शिरसाट, भीमराज गडधे आणि प्रेम साळवे या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. रवींद्र घनवट यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. संपूर्ण कार्यक्रमाच्या वातावरणात विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पाहुण्यांच्या मनात संमिश्र भावना होत्या.



