जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये माहितीचा अधिकार दिनानिमित्त वक्तृत्व व चर्चासत्र स्पर्धांचे आयोजन

माहितीचा अधिकार दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अधिकार, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, पारदर्शकता तसेच लोकशाही मूल्यांविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे वक्तृत्व व चर्चासत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 वी अशा दोन गटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत माहितीचा अधिकार, त्याचे महत्त्व, नागरिकांची भूमिका, पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि लोकशाही मूल्ये यांसारख्या विविध विषयांवर प्रभावीपणे विचार मांडले. माहितीचा अधिकार दिन का साजरा केला जातो व त्याचे महत्त्व याबाबत मुख्याध्यापक व्हि. एम. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण उपशिक्षक बी. पी. लोखंडे , ए.एम. खडसे व एस. बी. वंजारी यांनी केले.
विषयाशी सुसंगतता, माहितीची अचूकता, सर्जनशीलता, मांडणी, आकर्षकता आणि संदेशाची परिणामकारकता या निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले.
इयत्ता 5 वी ते 7 वी या प्रथम गटात ईश्वरी केतन पाटील हिने प्रथम, दर्शिता संदीप पाटील हिने द्वितीय, तर उत्कर्षा पांडुरंग दिवाने हिने तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता 8 वी ते 10 वी या द्वितीय गटात जान्हवी विकास पाटील हिने प्रथम, तर स्वाती मधुकर गावंडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.
तसेच चर्चासत्र स्पर्धेत निष्ठा गटाने प्रथम, तर ज्ञान गटाने द्वितीय क्रमांक मिळविला. चर्चासत्राचे परीक्षण उपशिक्षिक बी. एम. कोल्हे व एस. एस. सावकारे यांनी केले. यावेळी माहितीचा अधिकार, त्याचे फायदे, उपयोग तसेच मर्यादा यांसह विविध घटकांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे चर्चा केली व समाधानकारक उत्तरे दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये तसेच जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व समजण्यास मदत झाली. सहभागी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी कौतुक केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षिका वाय. एस. पाटील, आर. व्ही. महाजन उपशिक्षक के.आर. बऱ्हाटे , ए. पी. तांदळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते



