कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालूका शहापूर यांच्या पुढाकाराने तालूक्याच्या प्रत्येक विभागात जगदगुरू संत तुकाराम यांची जंयती साजरी झाली .

वासिंद – ( सचिन शेलवले )दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका शहापूरच्या पुढाकाराने तालुक्यात शेंद्रूण,कासगाव, खरीड, आष्टे, बोरशेती, सुगाव (खर्डी), वेळुक,आसनगाव आणि वासिंद या आठ ठिकाणी तसेच मुरबाड येथे जगद्गुरु संत तुकाराम यांची जयंती साजरी करण्यात आली.
वारकरी संप्रदायाचा कळस असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम यांच्या कथित वैकुंठ गमनादिवशी तुकाराम बीज सर्रास साजरी केली जाते. मात्र जयंती साजरी करण्याकडे समाजाचा फारसा कल दिसत नाही. ज्यांचा जन्म/अवतार इसवी सनाच्या पूर्वी कोणत्या तरी युगात झाला आहे अशा ऋषी/देवता यांच्या जन्माचा सोहळा आपण साजरा करतो पण इसवी सन ४०० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या एका महान संताच्या जन्म तारखेबाबत कोणताही माहिती पंचागकर्त्याना मिळू शकली नाही ही खेदाची गोष्ट आहे. परंतु अलिकडे इतिहास संशोधकांनी २ फेब्रुवारी ही संत तुकाराम महाराज यांची जन्मतारीख निश्चित केली आहे. त्यानुसार तुकाराम महाराज यांची जयंती काही संघटना/मंडळे साजरी करीत आहेत.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ही संताच्या आणि महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेली परिवर्तनाची चळवळ चालवणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात प्रथमच शाखेचे कार्यकर्ते व भाविक यांनी एकत्र येत विभागीय पातळीवर जगद्गुरु संत तुकाराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज जरी ही छोटी सुरूवात झाली असली तरी भविष्यात लोकं मोठ्या संख्येने एकत्रीत येऊन संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करतील यात शंका नाही.
संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून स्वर्ग, नरक, मोक्ष, पुनर्जन्म यासारख्या कल्पनांवर अभंग रचना न करता विवेकी, कर्मप्रधान समाज निर्माण होण्यासाठी आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांना उपदेश केला. त्यांचे अभंग वास्तववादी आहेत पण वास्तविकता मांडताना ते कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थांचे, बुद्धिजीवी वर्गाचे गीत बनले यावरून त्यांच्या अभंगाची ताकद दिसून येते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची ही प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका शहापूरच्या वतीने जयंतीनिमित्त करण्यात आला.
वासिंद येथील जयंती कार्यक्रमास छत्रपती संभाजी नगर येथील ख्यातनाम वक्ते, लेखक, प्रकाशक आणि किर्तनकार डॉ. बालाजी जाधव यांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत मुंबई एंटरटेनमेंट आणि संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडीचे मुख्य संयोजक श्री. योगेश पाटील व संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष श्री. अमित केरकर हे देखील उपस्थित होते. यावेळी शाखेच्या वतीने पुस्तक व शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाखेचे मार्गदर्शक ह. भ. प. पुंडलिक पाटील सर यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाविषयी उपस्थित श्रोत्यांसमोर थोडक्यात विवेचन केले. डॉ. बालाजी जाधव Balaji Jadhav
यांनी आपल्या छोटेखानी भाषणात जगद्गुरु संत तुकाराम यांच्या गाथेचे प्रकाशन, धर्माचा राजकारणासाठी होणारा वापर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील संत तुकाराम यांचे योगदान, देवाचे आणि धर्माचे त्यांनी केलेले लोकशाहीकरण, महाराजांनी दिलेले नैतिक शिक्षण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या असलेला प्रभाव याबाबत उपस्थितांना संबोधित केले. तसेच आपल्या लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यावर त्यांना तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग शिकवा असे आवाहन देखील उपस्थितांना केले. संत तुकाराम महाराज यांचे मंदिर साकारणारे तारमळे काका यांनी देखील आपले मनोगत मांडले



