स्कूल ऑफ स्कॉलर्स महिला शिक्षिका क्रिकेट संघाचे पालक महिला संघावर विजय

मलकापूर प्रतिनिधी शेख निसार :- १२ जानेवारी २०२५ राष्ट्रमाता जिजाऊ जयंती च्या औचित्य साधून मलकापूर शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स (CBSE) इथे महिला शिक्षिका विरुद्ध महिला पालक असे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धे मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांचे दोन संघ सहभागी झाले होते. सुरुवातीच्या सामन्यामध्ये महिला पालक राजमाता जिजाऊ संघ विरुद्ध रायझर मलकापूर असे क्रिकेट सामने झाले. सुरुवातीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मलकापूर रायझर संघाने प्रथम फलंदाजी करतांना आठ षटकांमध्ये सहा बाद ५६ धावा केल्या. जयश्री हिवरे १७ धावा, पुनम बाहेती ११ धावा केल्या. जिजाऊ संघाकडून गोलंदाजी करतांना प्रियंका व राजश्री साळुंके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जिजाऊ संघासमोर ५६ धावांचे लक्ष असतांना सुरुवातीला आक्रमक अशी सुरुवात राजश्री साळुंके यांनी करून २७ धावा केल्या आणि लिना यांनी १५ धावा, सोनाली यांनी ७ धावा केल्या व आपल्या संघाला आठ गाडी राखून विजय मिळवून दिला व अंतिम फेरीच्या सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना हा जिजाऊ महिला पालक क्रिकेट संघ व एस.ओ.एस महिला शिक्षिका क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करतांना एस.ओ.एस महिला संघाने आठ षटकांमध्ये एक गडी गमावून १०० धावा केल्या.एस.ओ.एस महिला संघाकडून आक्रमक सुरुवात अमृता भिसेन यांनी करून १७ चेंडू मध्ये ३४ धावा केल्या आणि कर्णधार वैष्णवी कपले यांनी २१ चेंडू मध्ये नाबाद ४५ धावा केल्या पायल बडगुजर यांनी सुद्धा १३ चेंडू मध्ये नाबाद १५ धावा केल्या. जिजाऊ महिला पालक संघासमोर १०१ धावांचे लक्ष असतांना संघाने आठ षटकामध्ये दोन गडी बाद ५० धावा केल्या. एस. ओ.एस महिला संघाकडून सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अंतिम सामना ५० धावांनी जिंकला. व सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकविले.
विजेत्या व उपविजेत्या संघाला शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. सुदीप्ता सरकार यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. या क्रिकेट सामन्याच्या आयोजनाबद्दल पालक संघातील खेळाडूंनी शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, संचालिका ममता संचेती व मुख्यध्यापिका सुदीप्ता सरकार यांचे आभार मानले. क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या घडून आणण्यासाठी शाळेतील क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, सर ओम गायकवाड, अजय शिंगणे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



