सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधीः राजेंद्र मुंडे खामगाव
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या; मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवण झाली नाही, तर उगवलेली पिकेही करपण्याच्या मार्गावर आहेत ढोरपगांव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मूग पिकाचे चित्र सध्या चिंताजनक परिस्थिती दर्शवत आहे. पावसाअभावी संपूर्ण मूग पीक वाळून गेले असून शेतकऱ्यांना ते अक्षरशः सोडून देण्याची वेळ आली आहे. तूर, मूग, कापूस यांसह इतर खरीप पिकांनाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत आहे
महागडी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडत असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

शेतकऱ्यांनी शासनाकडे दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत, नुकसान भरपाई आणि आवश्यक दिलासा देण्याची मागणी केली आहे. “सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना,” अशी हतबल भावना अनेक शेतकरी व्यक्त करत पावसाने लवकरच हजेरी लावली नाही, तर खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे



