संपूर्ण कर्जमुक्ती द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरी मुक्कमी जाऊ, दामुअण्णा इंगोले यांची घोषणा.

:कर्जमुक्ती गर्जना रॅलीत हजारो शेतकऱ्यांचा सहभाग
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव: देशातील मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयाचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले तसेच शेतकऱ्यांचेही संपूर्ण कर्ज माफ करावे अन्यथा हजारो शेतकरी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी मुक्कामी जाऊ अशी घोषणा स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी मालेगाव येथे काढण्यात आलेल्या ‘कर्जमुक्ती गर्जना रॅलीतून’ केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड तालुक्यातील लोणी येथून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन २२ जुलै पासून दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जनविचार स्वाभिमान यात्रा काढण्यात आली होती. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील १८३ गावांचा प्रवास करून दहा दिवसानंतर आज या यात्रेचा समारोप मालेगाव येथे शेतकरी कर्जमुक्ती गर्जना रॅलीने करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, सोयाबीनला दरवाढ देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी यासह लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजने प्रमाणे लाडका शेतकरी योजना राबवावी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षापासून सोयाबीनला अत्यल्प दर मिळत असल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पीक कर्ज भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत राहिली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या सगळ्याची जबाबदारी सरकारने घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना २०१३ साली त्यांनी सोयाबीनला किमान सहा हजार रुपये दर मिळावा यासाठी लातूर ते औरंगाबाद दिंडी काढली होती. आता आठ वर्ष झाले ते स्वतः सत्तेत आहेत मात्र त्यांना या त्यांच्याच मागणीचा विसर पडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना या मागणीची आठवण करून देणार आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा त्रास असून सरकारने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य धोरण आखावं. शेतीला कंपाउंड करण्यासाठी प्रभावी योजना आणावी व नुकसान भरपाईच्या मदतीत वाढ करावी तसेच नोकरदारांप्रमाणे शेतकरी शेतमजुरांनाही पेन्शन लागू करावी याही मागण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती. मालेगाव येथे झालेल्या कर्जमुक्ती गर्जना रॅलीमध्ये जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. तर मागण्या मान्य न झाल्यास या पुढच्या टप्प्यात थेट मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या घरी मुक्कामी राहून आंदोलन करणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.



