विदर्भाच्या तांत्रिक शिक्षणात अनुराधाची गरूडझेप; अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा*

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका : प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
केंद्र शासनाच्या युजीसीने दिली स्वायत्ततेची मान्यता; उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वतंत्र मूल्यमापनाचा मार्ग मोकळा
चिखलीतून आता जागतिक दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची नवी वाट; बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक लौकिकात भर
चिखली : विदर्भाच्या तांत्रिक शिक्षण क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा गाठला आहे. केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) महाविद्यालयाला स्वायत्त (Autonomous) दर्जा प्रदान केला आहे.
या मान्यतेमुळे महाविद्यालयाला बदलत्या औद्योगिक व तांत्रिक गरजांनुसार स्वतःचा अभ्यासक्रम विकसित करणे, त्यात आवश्यक बदल करणे, नवीन कौशल्याधारित व बहुविषयक अभ्यासक्रम सुरू करणे तसेच स्वतंत्र परीक्षा आणि मूल्यमापन प्रणाली राबविण्याचे शैक्षणिक स्वातंत्र्य मिळणार आहे. परिणामी ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख, संशोधनाधारित आणि जागतिक स्पर्धेला अनुरूप तांत्रिक शिक्षणाच्या नव्या संधींची दारे खुली झाली आहेत.
स्वायत्ततेमुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी अधिक वेगाने जोडणे शक्य होणार आहे. Artificial Intelligence, Data Science, Cyber Security, Internet of Things (IoT), Robotics, Electric Vehicles, Cloud Computing आणि Industry 4.0 यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांचा अभ्यासक्रमात प्रभावी समावेश करता येणार आहे.
प्रयोगशाळा, प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप, हॅकाथॉन, उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण आणि अनुभवाधारित शिक्षणावर अधिक भर देता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला त्याचा थेट फायदा होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने Electives, Honours, Minors, बहुविषयक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. असाइनमेंट, क्विझ, सादरीकरण, प्रकल्प आणि सत्र परीक्षांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण मूल्यमापनासह संस्थास्तरावर परीक्षा व्यवस्थापन केल्याने निकाल प्रक्रियाही अधिक गतिमान करता येणार आहे.
पदवी विद्यापीठाची; शैक्षणिक लवचिकता स्वायत्ततेची
महाविद्यालय स्वायत्त झाले असले तरी विद्यार्थ्यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पदवी प्राप्त होणार आहे. त्याचवेळी स्वायत्त संस्थेच्या अभ्यासक्रमातील लवचिकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संशोधन, पेटंट, स्टार्टअप, उद्योजकता आणि नवीन उत्पादन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक उपक्रम राबविण्याची संधीही स्वायत्ततेमुळे उपलब्ध होणार आहे.
तीन दशकांच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर स्वायत्ततेची मोहोर
परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या दूरदृष्टीतून १९९३ मध्ये अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना झाली. विदर्भातील उच्च व तांत्रिक शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेने गेल्या तीन दशकांत हजारो अभियंते घडविले आहेत.
महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्लीची मान्यता असून ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी कायम संलग्न आहे. संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी तसेच नव्याने मान्यताप्राप्त Artificial Intelligence and Data Science यासह विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे.
महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) २००१ मध्ये ‘A’ दर्जा, राष्ट्रीय मान्यता मंडळाची (NBA) २००८ मध्ये मान्यता, २०११ मध्ये ISO 9001:2008 प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाला NAAC कडून २०१८ मध्ये आणि द्वितीय सायकलमध्ये २०२४ मध्ये B++ दर्जा प्राप्त झाला आहे.
शैक्षणिक बांधिलकी आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब : राहुल भाऊ बोंद्रे
“अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा हा केवळ एका महाविद्यालयाचा सन्मान नसून चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव आहे. ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण देता येते, हे अनुराधा अभियांत्रिकीने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ही मान्यता म्हणजे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या दूरदृष्टीची, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांची, शैक्षणिक बांधिलकीची आणि गुणवत्तेप्रती असलेल्या निष्ठेची अधिकृत पोचपावती आहे,” अशी भावना संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार लोकनेते राहुलभाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केली.
संस्थेकडून प्राचार्यांसह संपूर्ण टीमचे अभिनंदन
महाविद्यालयाच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लोकनेते मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव, सचिव वृषालीताई बोंद्रे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वानेरे, विश्वस्त आत्माराम देशमाने, वर्धमान डहाळे, अथरोद्दीन काझी आणि संचालक डॉ. एम. एस. अली यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, सर्व अभियांत्रिकी शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्वायत्त दर्जामुळे अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तीन दशकांच्या शैक्षणिक वाटचालीला नवे वळण मिळाले असून, चिखलीसारख्या भागातून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य आणि उद्योगाभिमुख अभियांत्रिकी शिक्षणाची अधिक सक्षम व्यवस्था उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.✍️



