रोटरी क्लब अकोला यांच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, हाता येथील १२ विद्यार्थिनींना सायकल वाटप

अकोला:- दि. ३ जून जागतिक सायकल दिनानिमित्त रोटरी क्लब अकोला यांच्या वतीने मॉ. शारदा स्कूल, गीतानगर, अकोला येथे विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत श्री गजानन ज्ञान प्रसारक संस्था, अंदुरा (जुना) सचिव श्री प्रशांत वराळे साहेब तसेच श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, हाता यांच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा घाटे मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून विद्यालयातील इयत्ता नववीच्या १२ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी येणाऱ्या वाहतूक समस्यांवर मात करता यावी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना उत्कृष्ट दर्जाच्या, आकर्षक डिझाइनच्या व ब्रँडेड कंपनीच्या सायकली प्रदान करण्यात आल्या.
सायकल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये कु. वैष्णवी भगवान जाधव, कु. प्रतीक्षा श्रीराम मात्रे, कु. गायत्री गजानन इसयकार, कु. सपना सुनील दामोदर, कु. कृतिका पुरुषोत्तम कुटे, कु. दिव्या धुर्वर सावळे, कु. खुशी कैलास परघरमोर, कु. रोहिणी विजय वाघ, कु. आकांक्षा अमोल दामोदर, कु. शेजल गजानन आसटकार, कु. रिता प्रकाश दामोदर व कु. रक्षा किसन हिवराळे यांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत नियमित उपस्थित राहणे अधिक सुलभ होणार असून त्यांचा वेळ व श्रम यांची बचत होणार आहे. तसेच शिक्षणाविषयीचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब अकोला यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे कौतुक केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षकवृंद, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या सायकलींचा स्वीकार विद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक श्री संदीप शेवलकार व कर्मचारी श्री प्रमोद नागे यांनी केला. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान श्री स्वामी विवेकानंद विद्यालय, हाता येथे सर्व विद्यार्थिनींना पालक, ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत सायकलींचे औपचारिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालय प्रशासनाने दिली.
विद्यार्थिनींच्या शिक्षणाला गती देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.



