मनिषा कदम ACP तर अरुण मोकळ डेप्युटी कमिशनर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मनिषा कदम यांची पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर नियुक्ती झाली आहे. कर्तव्यदक्ष, धाडसी व जनाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
तसेच देऊळगाव राजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांची अ गट (वर्ग-१) डेप्युटी कमिशनर पदावर पदोन्नती झाली आहे. नगरपरिषदेत कार्यरत असताना त्यांनी अनेक धाडसी व ऐतिहासिक निर्णय घेत शहराच्या विकासाला नवी दिशा दिली.
सुमारे ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आराखड्यातील (DP) रस्ता अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात साकारण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी करून दाखवले. तसेच नगरपालिकेच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षण सुरू करणे, अत्याधुनिक संगणक कक्ष उभारणे, अग्निशमन दलासाठी दोन मोठ्या अग्निशमन गाड्या व बुलेट अग्निशमन मोटारसायकल उपलब्ध करून देणे, शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, नवीन नळ पाईपलाईन व विविध विकासकामे मार्गी लावणे यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले.
अल्प कालावधीत विकासकामांचा वेग वाढवून लोकाभिमुख प्रशासनाची छाप निर्माण करणारे अधिकारी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमुळे आजही अनेक नागरिक त्यांच्या कार्याची आठवण अभिमानाने काढतात.
मनिषा कदम व अरुण मोकळ या दोन्ही अधिकाऱ्यांच्या यशाबद्दल नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, पत्रकार व विविध संघटनांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.



