
(भिमराव परघरमोर)
मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मा. सामाजिक न्याय मंत्री (कॅबिनेट) राजेंद्रपाल गौतम यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बावीस प्रतिज्ञांचे जाहीर पठण केल्यामुळे, त्याचे राजकीय पडसाद उमटत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले. विशेष म्हणजे देशातील बहुजन वादाची शेखी मिरवणारांपैकी एकाही नेत्याने त्यांना पाठिंबा तर दूरच, परंतु त्यावर प्रतिक्रिया देणेही टाळले. असे का घडले असावे? त्याच्या कारण मिमांसेअंती असे लक्षात येते की, त्यांची बोलण्याची इच्छा असेलही कदाचित! परंतु बहुजन समाज (एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी,एसबीसी) हा त्यांचा मतदार दुखावला जाऊ नये म्हणून तर नसेल? बहुजनवादी राजकारणी त्यांना बऱ्याच ठिकाणी कातडीबचाव भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा संधीसाधू मनुवादी त्यांना धर्मविरोधी ठरवून कचाट्यात पकडण्याची संधी कदापिही सोडत नाहीत.
कदाचित बहुजन समाज आपल्या इतिहासासंबंधी जागृत असता? तर मनूवाद्यांनी कितीही कूसंधीच सोनं करण्याचा प्रयत्न केला असता, तरीही तो फळाला आला असताच असे नाही. म्हणून बहुजन समाजाने आपला इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. कारण जो समाज, जे राष्ट्र, जी कौम आपला इतिहास विसरते, ते एक तर काळाच्या ओघात लुप्त होतात किंवा कुणाचे तरी गुलाम होतात. असे होऊ नये असे वाटत असेल तर त्यासाठी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं ‘शूद्र पूर्वी कोण होते’ या पुस्तकाचं वाचन करावं जेणेकरून बऱ्याच संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. त्यामधून आम्हाला कळेल की, वर्णव्यवस्थेमध्ये आमचं स्थान काय? आमचा वर्ण कोणता? आमचा वर्ण जर शूद्र असेल तर तो कसा झाला? खरोखर आम्ही शूद्रच होतो, की पूर्वाश्रमीचे मूळनिवासी राज्यकर्ते? आमचा आणि बुद्ध धम्माचा काही संबंध होता का? असेल तर तो कसा संपुष्टात आला? तो कोणी आणि केव्हा संपुष्टात आणला? या सर्वांची उत्तरे मिळाली असती तर, बावीस प्रतिज्ञांचा आणि आमचा किती व कसा संबंध आहे हेही कळले असते.
आता बावीस प्रतिज्ञांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास त्यांचा उदय, उगम, विकास, प्रचार आणि प्रसार कसा झाला? बौद्ध साहित्यातील कोणत्या ग्रंथामध्ये त्यांचा समावेश आहे? जगभरात प्रचंड प्रमाणात बौद्ध साहित्य उपलब्ध असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या का दिल्या? त्याची प्रासंगीकता काय होती? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील समाज व्यवस्थेचा अभ्यास केला असता सर्व प्रयत्नांती त्यांच्या असे लक्षात आले की, भारतातील क्रमिक असमान विषमतावादी जाती व्यवस्थेचा डोलारा नेस्तनाबूत करणे कठीणच नाही तर ती अशक्यप्राय बाब आहे. तसेच लहान-मोठा, उच्चनीच, गरीब-श्रीमंत, वरचा-खालचा अशा या वर्गीय साखळीमध्ये आपल्याला कुठेही स्थान नसल्यामुळे, आपण आपली कडी कुठल्यातरी समतावादी भक्कम साखरदंडासोबत जोडावी म्हणून त्यांनी धर्मांतराची भीमप्रतिज्ञा करून तब्बल २१ वर्षांनी ती पूर्णत्वास नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही अद्वितीय आणि अजोड होती. अवघ्या अर्ध्या तासांमध्ये त्यांनी आपल्या पाच लक्ष अनुयायांना धम्मदीक्षित केले. सोबतच त्यांनी प्रत्येकाला प्रत्येकाने दिक्षित करण्याचा अधिकार देऊन बौद्ध परंपरेमध्ये नवीन पयंडाही घातला. आणखी त्यात नाविन्याची भर म्हणजे जागतिक स्तरावर उपलब्ध बौद्ध साहित्यामध्ये कुठेही न दिसणाऱ्या बावीस प्रतिज्ञांची स्वतः प्रसव करून त्याही प्रदान केल्या. बावीस प्रतिज्ञा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चिंतनाचा परिपाक होय. १९१३ ला लिहिलेल्या कास्ट इन इंडिया पासून तर १९५६ ला लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या सर्व लिखाण साहित्याचे त्यामध्ये प्रतिबिंब दिसून येते. त्यांनी गुरुस्थानी मानलेल्या बुद्ध, कबीर, फुले यांच्याही वैचारिक तथा सामाजिक चिंतनाचा त्यामध्ये प्रकाश दिसून येतो. त्या बावीस प्रकाश किरणांनी प्रत्येकाचे जीवन प्रकाशमान होईल एवढी जाज्वल्यता त्यामध्ये भासते. भारतीय संविधानाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने सुद्धा त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून प्रत्येक भारतीयांनी त्याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा सूत्रबद्ध व स्पष्ट अशा स्वरूपात आहेत. त्यापैकी अकरा प्रतिज्ञा ह्या जीवन जगताना काय नाकारायचं, तर उर्वरित अकरा ह्या काय स्वीकारायचं हे दर्शवतात. बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चिंतनातून त्यांची विभागणी केली असता बावीस प्रतिज्ञांपैकी पहिल्या पाच प्रतिज्ञा ह्या ब्राह्मणी देव देवतांना नाकारणाऱ्या आहेत. सहा ते आठ या प्रतिज्ञा भटमुक्त आणि भयमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेला आहेत. नववी व दहावी प्रतिज्ञा समतेचा संदेश देणाऱ्या असून, अकरा ते सतरा पर्यंतच्या प्रतिज्ञा ह्या बुद्धतत्त्वज्ञानाचा भक्कम पाया म्हणजे पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता यांचा संदेश देणाऱ्या आहेत. अठरा ते एकविस ह्या प्रतिज्ञा धम्माधारीत सदाचरणी जीवन जगण्यासाठी प्रेरणादायक संदेश देणाऱ्या मार्गदर्शक ठरतात. शेवटची म्हणजे बावीसवी प्रतिज्ञा ही बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या शिकवणुकीप्रमाणेच जीवन व्यतीत करण्यासाठी निर्णायक आहे. बावीस प्रतिज्ञा ह्या धर्मांतरित बौद्धांसाठी रक्तवाहिन्याच आहेत. जागतिक स्तरावर बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल तर त्रिशरण पंचशील ग्रहण करणे आवश्यक आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशीलाला मान्यता देऊन भारतीय दिक्षितांसाठी बावीस प्रतिज्ञांची अट कायमस्वरूपी घालून दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी तीन गोष्टी साध्य केल्या. पहिली म्हणजे धम्माचा स्विकार किंवा धर्मांतर करणे म्हणजे मनुष्य मात्राला नीच मानून, माणसाला त्याचे नैसर्गिक हक्क-अधिकारापासून वंचित ठेवून त्याचे सर्वांगीण शोषण करणाऱ्या ब्राह्मणी धर्माचा त्याग करणे व मनुष्यमात्राला संपूर्ण पातळ्यांवर समान लेखून सर्वाधिकार बहाल करणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणे होय. दुसरी गोष्ट म्हणजे नवदिक्षित व्यक्तीला बौद्ध समाजाचे सदस्यत्व बहाल करणे. तिसरी गोष्ट म्हणजे उपासक हा सदाचरणी असेल तर तो भिक्षूपेक्षा कमी नसतो हे मान्य करणे. बावीस प्रतिज्ञांना प्रतिष्ठा देण्याचं आणखी एक कारण म्हणजे धर्मांतरासमयी समाज हा अशिक्षित, अज्ञानी होता. त्यातच जो बौद्ध धर्म स्वीकारायचा होता त्याचे तत्त्वज्ञान समुद्रासारखे अथांग आणि अफाट पसरलेले असल्यामुळे, समुद्रातून जसे मोती काढणे दुरापास्त तसे त्या धर्मामध्ये काय जीवनोपयोगी आहे आणि काय नाही? हे कळत नव्हते. ह्या सर्व उणिवांची पूर्तता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले बुद्धिस्ट बायबल म्हणजे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ सुद्धा अप्रकाशित होता. त्यामुळे समाजाला मूळ बुद्ध विचारांशी जोडणे मोठे जिकरीचे काम होते. त्यातच त्यांच्यावर शेकडो हजारो वर्षांचे ब्राह्मण्यवादी संस्कार असल्यामुळे धर्मांतरितांची गत ही आगीतून निघून फुफाट्यात पडल्यागत होऊ नये म्हणून आपण धर्मांतर केले म्हणजे नेमके काय निर्णय घेतला? धर्मांतरानंतर आमची सभ्यता काय आहे? आम्ही कसे वागावे? याचे स्पष्ट आणि काटेकोर निर्देश म्हणजे बावीस प्रतिज्ञा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि बावीस प्रतिज्ञा म्हणजे इथल्या सनातन, अमानवी संस्कृतीला छेद देऊन केलेली धम्मक्रांती होय. त्यामुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्या प्रतिज्ञा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेखन आणि भाषणे या बावीस खंडांपैकी अठराव्या खंडाच्या भाग तीन मध्ये पृष्ठ ५१९ व ५२० वर छापलेल्या आहेत. एवढे असूनही भारतातील काही असामाजिक तत्त्वांना त्या खूपताना दिसतात. आजकाल महापुरुष तथा त्यांच्या विचारांवर वाचाळण्याची विकृती फोफावताना दिसत आहे. परंतु त्यांचे अनुयायी त्या विकृत संस्कृतीच्या कुविचारातील वाचाळविरांना सडेतोड उत्तर देण्यास समर्थ आहेत, हेही नसे थोडके!
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला
मो .९६०४०५६१०४




