भूमी मुक्ती मोर्चा संघटनेच्या पाठपुराव्याला प्रशासनाची दखल; अतिक्रमण प्रकरणांवर बैठक…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- २५ ऑगस्ट २०२६
भूमिमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून वन व महसूल जमिनीवरील अतिक्रमण धारकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणांची दखल घेतली आहे. जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत वन व महसूल जमिनीवरील अतिक्रमणाची प्रकरणे, त्यातील अडचणी तसेच संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपविभागीय अधिकारी काळे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील, जळगाव जामोद पंचायत समितीच्या बीडीओ कोरे मॅडम, पंचायत समिती संग्रामपूरचे बीडीओ काळे साहेब तसेच जळगाव जामोद वन विभागाचे आरएफओ निलेश काळे साहेब, अकोट वन विभागाचे एसएफ साहेब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप आंभोरे व अमोल तायडे यांनी अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न मांडत वन व महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारकांना येणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून पात्र अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीदरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिक्रमण प्रकरणांमध्ये येणाऱ्या प्रशासकीय व वन विभागाशी संबंधित अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्याबाबत विचारविनिमय झाला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भूमिमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या मागण्यांनंतर प्रशासनाने घेतलेली ही बैठक महत्त्वाची मानली जात असून, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढील काळात कोणती कार्यवाही होते, याकडे अतिक्रमणधारकांचे लक्ष लागले आहे.





