महाराष्ट्र

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी करा

रावेर तहसीलदारांना संघर्ष समितीचे निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर, दि. ६ ऑक्टोबर २०२६ :
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी निरागिका कोळी हिच्या वसतिगृहातील संशयास्पद मृत्यूची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप न होता स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणात संबंधित दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, दोष आढळल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही संघर्ष समितीने केली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणेची मागणी

शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस यंत्रणा नियुक्त करावी, तसेच शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि मृत्यूमागील सत्य जनतेसमोर यावे, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.

या निवेदनावर संघर्ष समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच संबंधित तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत.

पदाधिकारी व समाजबांधवांची उपस्थिती

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे, कार्याध्यक्ष दीपक तळले, उत्सव कमिटी अध्यक्ष विनोद कोळी, योगेश्वर कोळी, मनोहर कोळी, गणेश कोळी, भूषण तायडे, नितीन कोळी, अतुल कोळी, शामराव कोळी, विजय मानेकर, प्रवीण कोळी, प्रदीप रायमळे, किरण कोळी, विजय अवसरमल, विनोद तायडे, मयूर कोळी, सुपडू मोरे, शुभम कोळी यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button