केऱ्हाळे दारूच्या नशेत रक्तरंजित थरार! ग्राईंडर मशीनने मानेवर वार करून तरुणाचा खून

जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले; २५ वर्षीय राजू कापडेचा दुर्दैवी मृत्यू, संशयित ७२ वर्षीय व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर
रावेर, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : रावेर तालुक्यातील केर्हाळा येथे मंगळवारी भरदिवसा दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थरारक खुनाच्या घटनेत झाले. जुन्या वादातून दोन व्यक्तींमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीत ग्राईंडर मशीनने मानेवर वार झाल्याने राजू रवींद्र कापडे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने केऱ्हाळे संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केर्हाळा येथील इंदिरानगर परिसरात रामसिंग चिंधू भील (वय ७२) हे वास्तव्यास असून ते मिस्तरी काम करतात. मृत राजू कापडे आणि रामसिंग भील यांची एकमेकांशी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दारूच्या नशेत पुन्हा वाद, हाणामारीचे रूपांतर खुनात
मंगळवारी दुपारी साडेएकच्या सुमारास दोघेही मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद वाढत जाऊन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी लोखंडी आसारी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राईंडर मशीनने राजू कापडे यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात राजू कापडे गंभीर जखमी झाले आणि ते घटनास्थळीच कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
ग्रामस्थांनी संशयिताला पकडले
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ हालचाल करत संशयित रामसिंग भील याला पकडले. त्याला एका घरात कोंडून ठेवत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रावेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला पोलिसांच्या ताब्यात घेतले.
दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील राजू कापडे यांना उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
रावेर पोलिसांकडून तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमके कारण, हाणामारीची परिस्थिती आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या साधनाबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
भरदिवसा खुनाने तालुक्यात खळबळ
केर्हाळा येथे भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाला दारूच्या नशेत पुन्हा तोंड फुटल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.



