गुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

चिनावलमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार; २७ वर्षीय केळी व्यापाऱ्याचा मृत्यू

राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर डोक्यात गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज; गावठी कट्टा, पाच खोके व दोन जिवंत काडतुसे जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

चिनावल, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथे मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. शेतीसोबत केळी व्यापार करणाऱ्या २७ वर्षीय निर्मल युवराज महाजन याचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. प्राथमिक तपासात त्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या पाच रिकाम्या पुंगळ्यांमुळे या घटनेचे गूढ वाढले असून पोलीस विविध शक्यतांचा तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १२.०५ वाजता निर्मल महाजन याने घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत स्वतःला बंद करून घेतले. त्यानंतर देशी बनावटीच्या पिस्तुलातून उजव्या कानशिलावर गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळाच्या पंचनाम्यात पोलिसांना एक गावठी कट्टा, पाच रिकामे पुंगळे (खोके) आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली असून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पाच रिकामे खोके आढळल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गोळीबार किती वेळा झाला, काडतुसे यापूर्वी वापरण्यात आली होती का आणि गावठी कट्टा निर्मल महाजन याच्याकडे कसा आला, यासह विविध बाबींचा तपास सुरू आहे.

निर्मल महाजन हा शेतीसोबत केळी व्यापार करीत होता. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, व्यावसायिक कारण किंवा अन्य कोणता ताण होता का, या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत.

घटनेमुळे चिनावल परिसरात मध्यरात्रीपासूनच चर्चेला उधाण आले असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच गोळीबारामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button