पुरुष सत्ताक संस्कृतीचे द्योतक- महिला दिन(भिमराव परघरमोल)

महिला दिनाचा इतिहास तपासला असता भारतासह संपूर्ण विश्वामध्ये महिलांना वंचित, पीडित, शोषित, कमजोर तथा अबला ठेवण्यातच पुरुषांनी पुरुषार्थ गाजवल्याचे दिसून येते. तो पुरुषार्थ काही ठिकाणी पुरुषी अहंकार तथा विकृत मानसिकतेचा विखार प्रतीत होतो, तर कुठे जात, धर्म, लिंग, पंथ यासह विषमतावादी प्रवृत्तीने धर्मग्रंथांच्या परिवेष्टनात गुंडाळलेला धर्मांधतेचा कलह दिसून येतो. त्याचीच अनुभूती म्हणून, जगातील कोणत्याही देशात पुरुष दिन साजरा होत नाही. याउलट महिला दिन मात्र १९७५ पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या मान्यतेने संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या थीमसह थाटामाटात साजरा केला जातो.
महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व जाणून; त्यांना प्रेरणा देण्यासाठी सन्मान करणे, त्यांना बहुआयामी सक्षम बनवून लिंगभेद, हिंसा आणि अन्याय-अत्याचारा विरोधात मानवी मनाचे सिंचन करून महिलांना सर्वच क्षेत्रात संधीची समानता व सहभाग नोंदवण्याची मुभा उपलब्ध करून देण्यासाठी विविधांगी व भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व महिलांच्या हक्क अधिकारांबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
या सर्वांचे द्योतक हेच आहे की, महिलांना आजच्या प्रमाणे पूर्वी हक्क-अधिकार नव्हते किंवा ते देण्यासाठी पुरुषसत्ताक तथा अहंकारी, अमानवी प्रवृत्ती द्यायला तयारही नव्हती. त्यासाठी अनेकांना स्वतःहून कंबर कसावी लागली.
भारतामध्ये हुकूमशाही असताना जगामध्ये अनेक देश लोकशाहीचा आनंद घेत होते. परंतु महिलांना मूल्यात्मक हक्क-अधिकार देण्यास त्यांची कोती मानसिकता धजावत नव्हती. भारतातील इंग्रजी सत्ता ही बऱ्यापैकी विज्ञानवादी व तर्कनिष्ठ असूनही १८५७ च्या बंडानंतर उगाचच धर्मात ढवळाढवळ नको म्हणून त्यांनी बऱ्यापैकी माघार घेतली. भारतातील महिलांची गुलामी ही जगावेगळी होती. या अमानवी तथा अनैसर्गिक रुढी परंपरेच्या निर्मात्यांनी आपली मुलगी बहिण किंवा आईलाही तीळमात्र मुभा दिलेली दिसत नाही. उलट त्यांच्यासाठी नियमांची कर्मठता फारच वाईट आणि कठोर होती.
या संदर्भात एक शायर असे म्हणतो की,
क्या हसी आती है मुझे, हजरते इंसान पर।
फेले बद तो खुद करे, लानत करे शैतान पर।
भारतातील महिलांच्या गुलामीला वरील ओळी तंतोतंत लागू पडतात. त्यांना गुलामीत ठेवण्यासाठी अनेक धर्मग्रंथांची रचना करून ते अपौरुषय, म्हणजे ईश्वर निर्मित असल्याचे घोषित करून त्यांची चिकित्सा अथवा त्यावर शंका घेतल्यास तो धर्मद्रोह किंवा पाप ठरते. त्यामुळे अकाली वैधव्य येईल. नरकाचे द्वार उघडून त्यामध्ये आपली रवानगी होईल. इत्यादी भ्रम पसरवण्यात महिलाद्वेषी व्यवस्था यशस्वी झाली होती.
महिलांच्या गुलामीचे छातीठोक समर्थन करणाऱ्या काही प्रातिनिधीक उदाहरणांचा उल्लेख करणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरते. वेदांमध्ये मुलांप्रमाणे मुलींच्या जन्मासाठी एकही प्रार्थना दिसून येत नाही. काही ग्रंथांमध्ये स्त्रिया, शूद्र, कुत्रे व गाईंमध्ये असत्य, पाप व काळोख वसतो. स्त्रियांचे मन डवणे फार कठीण असते. त्यांच्यासोबत मैत्री होऊ शकत नाही. त्यांची हृदय हडळणीची असतात. असे अपमानास्पद उल्लेख आढळतात.
काही ग्रंथांमध्ये बहुपत्नीत्वाची चाल सांगितली आहे. अनेक बायका ह्या मालमत्ता म्हणून धारण करण्याची प्रथा होती. त्यांचा व्यापारही होत होता. एक स्त्री अनेक पुरुषांची सामूहिक मालमत्ताही असल्याचे उल्लेख मिळतात. मृत्यूनंतर परलोकात पतीची सेवा करता यावी म्हणून त्याच्या चितेवर जिवंतपणे स्वतःला जाळून घ्यावे. ही अघोरी प्रथा फक्त भारतातच होती. त्यांना जिवंत जाळण्यामागे सुद्धा काही लोकांचा कपटी आणि स्वार्थांध हेतू होता. एखाद्या महिलेला जर सती जायचे नसेल, तर तिचा पतीच्या भावासोबत पुनर्विवाह करावा. तेही शक्य नसेल तर विधवेच जिनं तिच्या नशिबी यायचं. त्यामध्ये तिला ताजं अन्न नाही, नवीन कपडे नाही, सणसमारंभाला हजेरी नाही, चारचौघांमध्ये मिरवण्याचा अधिकार नाही. एवढेच नव्हे तर तिच्या मुखकमलाचं दर्शनही अपशकुन! तिला मिळायची ती अंधार कोठडी. सौंदर्याचं प्रतीक असलेल्या केसांचा (मुंडन) त्याग. पांढऱ्या रंगाचे जाडे-भरडे कपडे. मिळेल ते शिळपाकं खावं आणि गपगुमान बसावं. अशामध्ये ती अनेकांच्या शोषणाला बळी पडायची.
काही धर्मग्रंथांमध्ये तर स्त्रियांना हुंडयामध्ये देण्याचीही प्रथा सांगितली आहे. भावा-बहिणीचे मुलीचे आणि बापाचे सहसंबंधाचे समर्थन करण्यासही काहींची छाती धजावलेली दिसून येते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी या याजकाच्या पत्नी संदर्भातील उल्लेख घृणास्पद आढळतात. मनुस्मृति सारख्या ग्रंथांनी तर कहरच केल्याचे दिसून येते. विस्तार भयास्तव आणि नैतिक मर्यादामुळे काहींचा उल्लेख टाळलेलाच बरा.
वरील सर्व प्रथा परंपरांचे नियम पाहता, ही महिलांसोबत केलेली मखलाशी, मानवी कपट, पुरुषी कावा, शब्दच्छ्ल दिसून येतो. हे कपटकारस्थान सर्वप्रथम संतांनी तथा महापुरुषांनी ओळखून त्या विरोधात बंड केले. धर्मग्रंथांचे प्रामाण्य नाकारले. महिला पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत हे अनेक उदाहरणांनी सिद्ध केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला मूलभूत कर्तव्य दिले. त्यानुसार स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाला न्यूनता किंवा कमीपणा आणणाऱ्या प्रथा परंपरांचा स्वतःहून त्याग करावा व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा. तसेच मूलभूत अधिकारांमध्ये महिलांसह मानवी व्यक्तिमत्वाला कमीपणा आणणारे कायदे संपवून मूलभूत अधिकाराला विसंगत कायदे न करण्याचे बंधन राज्यांना घालून दिले. सोबतच महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी हवे ते कायदे करण्यास अधिकारीत केले.
एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारतात महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून त्यांना घटनादत्त अधिकार देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस कष्ट करून; आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता संविधान निर्मितीचं ओझं पाठी असूनही हिंदू कोड बिल तयार केले. ते प्रथम संविधान सभेमध्ये व नंतर संसदेमध्ये पास न होऊ शकल्यामुळे त्यांनी महिलांसाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. आज स्त्रियांना जे हक्क अधिकार मिळाले आहेत, जसे दत्तक घेण्याचा तथा जाण्याचा, घटस्फोट घेण्याचा-देण्याचा, पोटगी मिळवण्याचा, एकपत्नीत्व, एकपतीत्व, आंतरजातीय विवाह मान्यता, मुलांचे पालकत्व, हुंडयास प्रतिबंध, स्वतःच्या मिळकतीवर अधिकार तथा पती व वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलांप्रमाणे समान वाटा. ही सर्व हिंदू कोड बिलाची बदौलत आहे.
यानंतर मात्र पुन्हा महिलांची गुलामी परत येते की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण संत महापुरुषांनी ज्या-ज्या धर्मग्रंथांचे प्रामाण्य तथा अपौरुषत्व नाकारले, त्यावरच आधारित नवीन संविधानाची घोषणा करण्यात आली आहे. कारण त्यांना विद्यमान संविधान मान्य नाही. त्यामुळे ते बदलण्याचे संकेत अनेक वाचाळांनी दिलेले आहेत. त्यालाच अनुसरून की काय? महिलांवरील अन्याय-अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते . मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी, धर्माच्या नावाखाली किंवा जात श्रेष्ठत्वाच्या भावनेमुळे बलात्कार केले जात आहेत. अशा आरोपींची शिक्षा माफ करून त्यांना पेढे भरून त्यांचे जंगी स्वागत होत आहे. पिडिता जर मागासवर्गीय असेल तर तिचे प्रेतही आई-वडिलांना न दाखवता परस्पर अंत्यविधी आटोपला जातो. मागास पिडिता कोर्टाकडे दाद मागायला गेली तर मनुस्मृतीचे दाखले देऊन तिला मंगळ आहे का? हे तपासण्यासाठी ज्योतिषांना आदेश दिले जात आहे. संपत्तीतील वाटा नाकारला जातो. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. परंतु खऱ्या वेदना तर तेव्हा होतात, जेव्हा काही विदुषी महिला मनुस्मृतीच्या समर्थनार्थ विद्वत्ता पाजळतात. परंतु त्यांना मात्र महापुरुषांचा त्याग, कष्ट, समर्पणाचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.
महिलांनी हा कावा ओळखून वेळीच सावरलं पाहिजे. अन्यथा मनुवादी व्यवस्था नवगुलामीचे जाळे घेऊन तयारच आहे…..
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जिल्हा अकोला



