परमार्थिक साधना कधीच निष्फल होत नाही.श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

परमार्थिक साधकाचे भगवत्प्राप्तीरुपी साध्य जरी निश्चित असले तरी, त्याच्या प्रवासाचा पंथ मात्र खूपच खडतर आहे. म्हणून प्रार्थनापूर्वक प्रयत्नांची पराकाष्टा करीत प्रेमाने परमार्थ केल्यास प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर साध्या प्रत निश्चितच पोचता येते. यदाकदाचित साधणारत साधकाचा साध्य प्राप्ती आधी आयुष्यभर आवडला तर त्या साधकाच्या शरीराचे सार्थक होते. देहत्यागाआधी जर साध्य प्राप्त झाले तर त्याच्या जीवनाचे सार्थक होते अर्थातच परमार्थिक साधना कधीच निष्फल होत नाही असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिरात चातुर्मास्य महोत्सवात दर एकादशीला श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे येणाऱ्या दिंडीतील बहुसंख्य वारकऱ्यांसमोर प्रवचन प्रसंगी असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की प्रापंचिक क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचा जर आज उपयोग झाला नाही तर उद्या त्याचा जसाच्या तसा उपयोग होईल याची कुठलीही शाश्वती नाही. परमार्थिक जीवनाची मात्र या जन्माची अपूर्ण साधना दुसऱ्या जन्मात जातीस्मरतेच्या माध्यमातून जशीच्या तशी प्राप्त होऊन, प्रसंगी शरीरांतरानंतरही जीवनोद्धाराची खात्री प्रदान करते. म्हणून परमार्थ करतांना काळ ,वेळ, वयाचा कुठलाही विचार न करता जेव्हा परमार्थ करण्याची इच्छा किंवा संधी प्राप्त होईल त्याच क्षणी पुराणोक्त अजामेळ्याप्रमाणे त्याचा अविलंब प्रारंभ करून, संधीचे सोने केले पाहिजे.
गोकुळ अष्टमी सप्ताहाचे आयोजन
लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान तथा भगवानश्री ज्ञानोबाराय यांच्या अवर्तीणोत्सवाचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि.२९/८ ते ५/९/२६ पर्यंत श्री ज्ञानेश आश्रमाच्या निर्मितीस कारण असणाऱ्या मूळ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये काकडा, विष्णुसहस्त्रनाम,गोपीगीत, भ्रमरगीत, हनुमान चालीसा, श्रीकृष्ण लीलामृत या विषयावर प्रवचने व हरिपाठ अशाप्रकारे भरगच्च स्वरूपाचा आश्रमा अतंर्गत श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होईल. सदर्हु कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन महाराजांनी प्रवचन प्रसंगी केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.





