चिनावल येथे पूजनीय भदंत नागवंश यांच्या धम्मदेसनेतून समाजपरिवर्तन: अलका तायडे यांनी केली अनिष्ट रुढी-परंपरांना मूठमाती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर: प्रतिनिधी विनोद तायडे
चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहारामध्ये पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या पावन मार्गदर्शनाखाली वर्षावास कार्यक्रम अत्यंत उत्साहात सुरू आहे. दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी या वर्षावासाचा २७ वा दिवस अनेक धम्म उपासक व उपासिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
धम्मसंस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
या प्रसंगी पूजनीय भंतेजींनी उपस्थितांना बौद्ध धर्मातील १० महत्त्वाच्या संस्कारांपैकी ‘गर्भ मंगल’ आणि ‘नामकरण संस्कार’ या दोन संस्कारांविषयी सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली.
प्रवचनादरम्यान भंतेजींनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्माविषयीच्या क्रांतिकारी विचारांचा संदर्भ देत स्पष्ट केले की,
”धम्म हा केवळ पूजापाठ नसून ती मानवी जीवनाची आचारसंहिता आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार स्तंभांवर आधारलेला धम्मच मानवी समाजाचा उद्धार करू शकतो. बुद्ध धम्म हा बुद्धीप्रामाण्यवादी असून तो माणसाला अज्ञानातून आणि अनिष्ट रुढी-परंपरांच्या विळख्यातून बाहेर काढून स्वाभिमानाने जगायला शिकवतो.”
प्रवचनाच्या प्रभावातून चिनावल नगरीत प्रत्यक्ष परिवर्तन
काल संपूर्ण परिसरात ‘रोट’ हा सण साजरा केला जात असताना, बुद्ध विहारातील उपासक-उपासिकांनी मात्र कोणत्याही हिंदू सण वा रुढी-परंपरांचे पालन न करून आपल्या धम्मनिष्ठेचा परिचय दिला.
विशेष म्हणजे, गावातील उपासिका श्रीमंती अलका तायडे यांनी यापूर्वी ‘रोट’ या पूजेचे साहित्य विकत घेतले होते. परंतु, भंतेजींच्या प्रबोधनात्मक व वैचारिक प्रवचनाचा त्यांच्या मनावर असा सकारात्मक प्रभाव पडला की, त्यांनी विहारातील संपूर्ण जनसमुदायासमोर पूजेचे संपूर्ण साहित्य आणून ठेवले. “आम्ही कोणताही रोट किंवा हिंदू सण साजरा केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही,” असा खंबीर आणि क्रांतिकारक निर्धार त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केला.
त्यांच्या या धाडसी व परिवर्तनवादी निर्णयाचे विहारामधील सर्व उपासक-उपासिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विशेष कौतुक व अभिनंदन केले. भंतेजींच्या प्रभावी धम्मदेशनेमुळेच चिनावल नगरीत हे वैचारिक परिवर्तन शक्य झाले आहे.
भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान संजय भालेराव व सर्व समिती सदस्यांनी आवाहन केले आहे की, रोज सायंकाळी ७:०० ते ८:३० या वेळेत धम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी सर्व उपासक-उपासिकांनी बुद्ध विहारामध्ये वेळेवर उपस्थित राहावे.
तसेच, *भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिका संघाच्या वतीने रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष *’महिला धम्म प्रशिक्षण शिबिर’* आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण शिबिराला व वर्षावासाला पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी चिनावल व परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन धम्माची ओळख, ज्ञान व समज वाढवण्यासाठी सहकार्य करावे, अशी आग्रहाची विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
आयोजक: भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिका संघ, चिनावल.





