बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या ‘सहकार पॅनल’चा दणदणीत विजय; देऊळगाव राजा शहरात फटाक्यांची आतिशबाजी आणि गुलाल उधळत जल्लोष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (BDCC) निवडणुकीत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’ने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सहकार पॅनलने एकूण २१ जागांपैकी तब्बल १९ जागांवर एकहाती विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झुकवली आणि विरोधकांचा धुव्वा उडवला.
देऊळगाव राजा शहरात विजयी जल्लोष
या अभूतपूर्व विजयाचे वृत्त समजताच देऊळगाव राजा शहरात सहकार पॅनलच्या वतीने प्रचंड जल्लोष करण्यात आला. शहरातील मुख्य बस स्टँड चौकात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणाबाजी करत, प्रचंड फटाक्यांची आतिशबाजी केली आणि एकमेकांवर गुलालाची उधळण करून विजय साजरा केला. संपूर्ण बस स्टँड परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता.
दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या विजयोत्सवामध्ये देऊळगाव राजा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मतदारांनी सहकार पॅनलच्या पदरात भरभरून मते टाकल्याची भावना यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. या विजयामुळे जिल्ह्यात सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.





