आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; मुक्ताईनगरात विविध संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

सोनम वांगचुक प्रकरणाचा निषेध; शिक्षण व्यवस्थेत पारदर्शक सुधारणांची मुक्ताईनगरातून जोरदार मागणी

संपादकीय बातमी :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच देशातील शिक्षण व परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी व्यापक सुधारणा राबविण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह मुक्ताईनगर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशातील शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत प्रभावी व तांत्रिक सुधारणा तातडीने लागू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचाही उल्लेख करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना इच्छेविरुद्ध ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. शांततापूर्ण व अहिंसक आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनावर बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

संघटनांच्या वतीने १८ जुलै २०२६ रोजी जंतर-मंतर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. संबंधित कारवाईची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, तसेच देशातील परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, भ्रष्टाचारमुक्त आणि विश्वासार्ह करण्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणा तातडीने राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन सादर करताना ॲड. सहदेव तायडे, मोहन मेढे, विश्वनाथ मोरे, समाधान गवई, वसंत लहासे, अरुण वानखेडे, लक्ष्मण भालेराव, ॲड. राहुल पाटील, लक्ष्मण चौके, रमेश बोदडे, मधुकर भोई, सुनील कोळी, अनिल सोनवणे, संभाजी पारधी, संजय धुंदले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button