दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राजूमामांचा पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीत २ लाखांचे योगदान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे
जळगाव :
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीतून जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.
दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संकटाच्या काळात शासनाच्या मदत योजनांसोबतच समाजातील सक्षम घटकांनीही पुढाकार घेऊन गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावणे आवश्यक असल्याची भूमिका आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केली.
“संकटाच्या काळात समाजाची साथही महत्त्वाची”
यावेळी आमदार राजूमामा भोळे म्हणाले, “दुष्काळ ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. अशा कठीण परिस्थितीत समाजातील प्रत्येक सक्षम घटकाने आपली सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली मदत एखाद्या गरजू कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.”
सक्षम घटकांनी पुढे येण्याचे आवाहन
जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच विविध क्षेत्रातील सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार भोळे यांनी केले.
“आज आपण दिलेला मदतीचा हात उद्या एखाद्या कुटुंबाला संकटातून सावरण्याचे बळ देऊ शकतो. ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ या भावनेतून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.
शासनाचा हात आणि समाजाची साथ गरजेची
दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू असताना समाजातील दानशूर व सक्षम घटकांनीही योगदान दिल्यास मदतीचा हा प्रयत्न अधिक व्यापक होऊ शकतो.
संकटाच्या काळात शासनाचा हात आणि समाजाची साथ एकत्र आली, तर अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो, याच भावनेतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. इतरांनीही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी केले.



